
महापालिका शाळांनी घडवला इतिहास
मुंबई, ता. २२ (बातमीदार) ः मुंबई पोलिस शिक्षण विभागाच्या वतीने पूर्व उपनगराच्या आर.एस.पी. रॅलीचे आयोजन नुकतेच चेंबूर येथील आर.सी.एफ. मैदान येथे करण्यात आले होते. पालिका शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच मुंबई महापालिका बॅण्ड पथक या आर.एस.पी. रॅलीत सहभागी झाले होते.
मुलुंड ‘टी’ विभागातील मुलुंड कॅम्प शाळा संकुलाच्या बॅण्ड पथकाने प्रथमच या रॅलीत सहभागी होऊन एक नवा इतिहास घडवला. यापूर्वी कधीही मुंबई महापालिका शाळा बॅण्ड पथकात सहभागी झाली नव्हती. या रॅलीत एकूण ३७ प्लॅटून व ७ बॅण्ड पथके सहभागी झाली होती. यापैकी मुंबई महापालिकेचे ७ प्लॅटून सहभागी झाले होते. यामध्ये मुलुंड कॅम्प संकुलातील मुलुंड कॅम्प महापालिका मराठी शाळा क्र. २ व मुलुंड कॅम्प महापालिका इंग्रजी शाळेतील मुलांनी दमदार सादरीकरण केले. मुलुंड ‘टी’ विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी ही संधी मुलांना उपलब्ध करून दिली होती. मुलुंड ‘टी’ विभागाचे प्रशासकीय अधिकारी कैलाशचंद्र आर्य, विभाग निरीक्षिका कांचन गोसावी यांनी बॅण्डचे सादरीकरण करून इतिहास घडवणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे. बॅण्ड प्रशिक्षक राजेश शिंदे, राजेश अवघडे, अनिल पाटील व मीना महाडिक यांचे उत्तम सहकार्य लाभले. मुलुंड कॅम्प संकुलातील शारीरिक शिक्षण शिक्षक दिलीप अहिनवे व यशवंत चव्हाण यांनी मुलांचा कसून सराव करून घेतला. वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, कनिष्ठ पर्यवेक्षक धैर्यधर पाटील व मधुकर माळी यांनी उत्तम सादरीकरण केल्याबद्दल मुलांचे अभिनंदन केले.