
डहाणूत गौण खनिज वाहतुकीविरोधात विशेष पथक
कासा, ता. २२ (बातमीदार) : डहाणूच्या महसूल विभागाने डहाणू-चारोटी रस्त्यावर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी तहासीलदार अभिजीत देशमुख यांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकाने दिवसभरात केलेल्या वाहन तपासणीत सुमारे एक लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या डहाणू तालुक्यातून अनेक राष्ट्रीय प्रकल्प सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती व गौण खनिजांची वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांमार्फत क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केली जात आहे. या प्रकाराला आळा बसावा यासाठी डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी अशा वाहनांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाई सुरू केली आहे. या पथकाने संशय असलेल्या १३ ते १४ वाहनांची तपासणी केली. यात क्षमतेपेक्षा अधिकच्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळले. या वाहनचालक आणि मालकांकडून एक लाख १४ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.