राज्यातील ७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील ७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार?
राज्यातील ७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार?

राज्यातील ७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार?

sakal_logo
By

नितीन पाटील ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः माध्यमिक शाळांतील धार्मिक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज सादर करण्याची मुदत उलटून गेल्यानंतरदेखील शाळांकडेच अर्ज प्रलंबित राहिल्याने राज्यभरातील सुमारे सात हजार विद्यार्थी आपल्या हक्काच्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर का निश्चित करू नये? असे विचारत राज्याच्या शिक्षण संचालनालयाने राज्यभरातील माध्यमिक शाळेच्या मुख्यापकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे आदेश सर्व विभागीय उपसंचालक तसेच शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
धार्मिक विद्यार्थ्यांना द्यावयाच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना २०२२–२३ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्र शासनाने एनएसपी२.० या पोर्टलवर २० जुलैपासून सुरू केली. तसेच नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी भरलेल्या अर्जांची पडताळणी करण्याची शाळा स्तरावरील अंतिम मुदत ३० नोव्हेंबर; तर जिल्हास्तरावरील अंतिम मुदत १५ डिसेंबर असल्याबाबत केंद्र शासनाने राज्य सरकारला कळविले होते. असे असताना बऱ्याच शाळांकडून वेळेची मर्यादा न पाळल्याने हजारो मुलांचे नवीन व नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी अभावी तसेच प्रलंबित राहिले.
याबाबत राज्याच्या शिक्षण संचालनाला मार्फत वेळोवेळी व्हीसीद्वारे आढावा घेऊन अर्जांबाबत वेळेत कार्यवाही करण्याबाबत सूचनाही दिल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर शिक्षण संचालन्याद्वारे दहा वेळा परिपत्रके काढून शाळांना कळविण्यात आले होते. तरीही शाळांकडून योग्य ती कार्यवाही न झाल्याने अर्ज पडताळणी अभावी प्रलंबित राहिल्याने विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रलंबित अर्जांची आकडेवारी
प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
नवीन २३९८ नूतनीकरण- १९७१
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
नवीन २११९
दिव्यांग विद्यार्थी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
नवीन १९३ नूतनीकरण २०
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना
नवीन २१ नूतनीकरण- ३०१
एकूण ७०२३ अर्ज पडताळणी अभावी प्रलंबित

शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर देखील अनेक अर्ज पडताळणी अभावी शाळांकडेच पडून आहेत. शाळांनी वेळीच लक्ष घालून ते शिक्षणाधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी पाठवावयास हवे होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणांमुळे अर्ज पडताळणी अभावी प्रलंबित राहिले आहेत याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून लेखी खुलासा मागविण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.
– राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक (योजना), शिक्षण संचालनालय

शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वारंवार मागून देखील पालकांकडून वेळेवर मिळत नाहीत. याबाबत आम्ही वेळोवेळी वरिष्ठांना अवगत केलेले आहे. या कारणामुळे नवीन व नूतनीकरण अर्ज यांची पडताळणी करून ते सादर करण्यास विलंब होतो. कोणतीच शाळा मुलांचे नुकसान होईल असे काम करीत नाही आम्ही राज्याच्या शिक्षण संचालकांना अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासाठी विनंती करू.
– ज्ञानेश्वर म्हात्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ