
निवडणुकीनंतर उपसरपंचपदासाठी ‘फिल्डिंग’
नवीन पनवेल, ता. २२ (वार्ताहर)ः तालुक्यातील १० ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यावर आता उपसरपंचपदासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ही निवड होत असल्याने काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे.
केंद्राकडून आता थेट ग्रामपंचायतींना विकासनिधी मिळतो. हा निधी खर्च करण्याचे सर्वाधिकार सरपंचांना आहेत. सरपंचांच्या अनुपस्थितीत हे अधिकार उपसरपंचांना असतात. त्यामुळे सरपंचाइतकेच गावपातळीवर उपसरपंचांनाही महत्त्व आहे. अशातच अनेक ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील गावगाड्याचे कारभारी ठरवताना मतदारांनी अनेक प्रस्थापितांना धक्का दिला आहे. काही राजकीय नेत्यांनी आपल्या गावचे, आमदारांनी आपल्या मतदारसंघातील गड शाबूत ठेवले; पण सरपंचपद नाही तर आता उपसरपंचपद मिळवता येईल, अशी सदस्यसंख्या असलेल्या गावांमध्ये पुन्हा आघाडीचा खेळ खेळला जाण्याची शक्यता आहे. विशेषतः उपसरपंचपदाचे महत्त्व ओळखून काही गावांत या पदासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
--------------------------
मिळालेल्या मतांची वजाबाकी सुरू
निवडणूक निकालानंतर आता विजयी उमेदवाराला कोणी मदत केली, विरोध असतानाही कोणी साथ दिली, याची चर्चा करीत आहेत; तर पराभूत उमेदवार- खर्च केला, प्रत्येकाच्या पाया पडलो, तरीदेखील पराभव झाल्याने आत्मचिंतन करत आहेत.