
१७ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : घणसोलीतून दुचाकीवर एमआयडीसी मार्गे विटावा येथे जाणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचा भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
या अपघातातील मृत तरुणाचे नाव दत्तात्रय ऊर्फ मंथन जालिंदर तळेकर (१७) असे आहे; तर जखमी झालेल्या त्याच्या मित्रांचे नाव ऋषिकेश चोपडे (१९) असे आहे. हे दोघेही ठाण्यातील विटावा भागात राहणारे आहेत. ऋषिकेश व दत्तात्रय ऊर्फ मंथन हे दोघेजण मावसभावाची स्कुटी घेऊन घणसोली येथे मित्राला जेवणाचा डबा देण्यासाठी गेले होते. मित्राला डबा दिल्यानंतर दोघेही घणसोली येथून ठाणे-बेलापूर रोडऐवजी एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने दिघा बाजूकडे जात होते. त्याच वेळी सायंकाळी ६ च्या सुमारास रबाळे एमआयडीसीतील खडी मशीनजवळ त्यांची स्कुटी दुभाजकावर धडकली. त्यामुळे रस्त्यावर फेकला गेलेला दत्तात्रय ऊर्फ मंथन दिघा बाजूकडून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला होता.