
नववर्षात पनवेल रेल्वे स्थानकात उद्वाहन
नवीन पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेत उद्वाहन बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. साधारण २० प्रवाशांची क्षमता या उद्वाहनाची आहे. स्थानकात अनेक महिने रखडलेले उद्वाहनाबद्दल स्थानिक प्रवासी संघटना पाठपुरावा करत होती. अखेर त्याला यश मिळाल्याने नववर्षात ते प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
पनवेल रेल्वेस्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलाला उद्वाहन बसवले आहे; मात्र स्टक्चर तयार होऊन अनेक महिने लोटले, तरी पनवेल स्थानकातील पादचारी पुलाला लागून बांधलेले उद्वाहन प्रवाशांच्या सेवेत येत नव्हते. त्यामुळे स्थानकात उद्वाहन व्हावे, यासाठी प्रवाशांनी स्थानिक रेल्वे प्रशासनाला उद्वाहन तत्काळ सुरू करण्याची विनंती केली होती. परंतु, पूर्वीच्या ठेकेदाराने अर्धवट काम सोडून गेल्याने उद्वाहक बसवण्यास विलंब लागला होता, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. परंतु सद्यस्थितीत उद्वाहनाचे काम पूर्णत्वास आले असून, नवीन वर्षात ते प्रवाशांना वापरता येणार आहे.