‘अक्षरबंध’ पुरस्कारांचा रविवारी वितरण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अक्षरबंध’ पुरस्कारांचा रविवारी वितरण सोहळा
‘अक्षरबंध’ पुरस्कारांचा रविवारी वितरण सोहळा

‘अक्षरबंध’ पुरस्कारांचा रविवारी वितरण सोहळा

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : नाशिकच्या ‘अक्षरबंध’ प्रतिष्ठानतर्फे ‘राज्यस्तरीय अक्षरबंध साहित्य पुरस्कारां’च्या वितरणासह ‘सकाळ’ मुंबईच्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्काराने रविवारी (ता. २५) सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध कवी, सिनेगीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ऐश्‍वर्य पाटेकर, विजयकुमार मिठे, प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, विवेक उगलमुगले, यशवंत पाटील, किरण भावसार, राजू देसले, प्रशांत भरवीरकर, प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे आणि प्रा. विद्या सुर्वे-बोरसे उपस्थित राहणार आहेत.

अक्षरबंध साहित्य पुरस्कारांमध्ये औरंगाबाद येथील ज्योती सोनवणे यांचे ‘दमकोंडी’ कथासंग्रह, पिंपळगाव येथील लक्ष्मण महाडिक यांचे ‘स्त्री कुसाच्या कविता’ काव्यसंग्रह, औरंगाबाद येथील रमेश रावळकर यांची ‘टिश्‍यू पेपर’ कादंबरी, मुंबईतील डॉ. स्मिता दातार यांचे ‘प्रभु अजि गमला’ चरित्रलेखन, मुंबईतीलच वीणा रारावीकर यांचे ‘आकाशवीणा’ हे ललित वाङ्मय, नाशिक येथील राजेंद्र उगले यांचे ‘थांब ना रे ढगोबा’ बालकथासंग्रह, पुणे येथील प्रसाद ढापरे यांचे ‘इकिगाई’ हे अनुवादित पुस्तक आणि अमरावती येथील डॉ. राजेंद्र राऊत यांच्या ‘लीळाचरित्रातील कथनरूपे’ या समीक्षापर ग्रंथाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रुपये तीन हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाशिक-ओझर रोडवरील ‘पुस्तकांचे हॉटेल - आजीचे वाचनालय’ या ठिकाणी रविवारी (ता. २५) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. साहित्यिक व साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रवीण जोंधळे, उपाध्यक्ष सप्तर्षी माळी, सचिव साई बागडे, तसेच पदाधिकारी सुवर्णा घुगे, कल्याणी बागडे, डॉ. गणेश मोगल, योगेश विधाते आदींनी केले आहे.

जीवनगौरव, साहित्यरत्न
‘अक्षरबंध’तर्फे झालेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच सटाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक शंकर कापडणीस यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रुपये पाच हजार ‘अक्षरबंध जीवनगौरव पुरस्काराने’; तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या निशा डांगे-नायगावकर यांना ‘अक्षरबंध साहित्यरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.