तलासरी ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरी ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविना
तलासरी ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविना

तलासरी ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविना

sakal_logo
By

कासा, ता. २२ (बातमीदार) ः तलासरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा कारभार आश्रमशाळेचे तपासणी पथक हाकत आहे. आश्रम शाळेचे फिरते पथक मुलांच्या तपासणी बरोबर ग्रामीण रुग्णालय पण सांभाळत आहे. तलासरी ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदांपैकी १२ पदे भरलेली असून १५ पदे रिक्त आहेत.

तलासरी ग्रामीण रुग्णालयात वार्षिक ३० ते ४० हजार बाह्यरुग्ण तसेच जवळपास १० हजारांच्यावर अंतररुग्ण उपचार घेत असतात. तलासरी तसेच डहाणू भागातील रुग्णांना या ग्रामीण रुग्णालयाचा आधार आहे. पण, रुग्णालयात असलेल्या रिक्त पदांमुळे पथकावर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. तलासरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी यांची ३ पदे आहेत. पण तिन्ही पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर सहाय्यक अधीक्षक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा अधिकारी, वाहनचालक, शिपाई अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदे असून त्यापैकी फक्त १२ पदे भरलेली आहेत. तर, १५ पदे रिक्त आहेत.

तलासरी तालुक्यात अनेक आश्रम शाळेतील मुला मुलींची तपासणी करण्याकरिता आरोग्य पथक आहे. या आरोग्य पथकात दोन वैद्यकीय अधिकारी, एक एएनएम, एक वाहन चालक अशी चार पदे भरलेली आहेत. त्यांना आश्रम शाळेतील मुलामुलींची आरोग्य तपासणी, उपचार करावे लागतात. त्यांच्याकडे आधीच कामाचा ताण असताना अतिरिक्त कामाचा ताण सोपवण्यात आला आहे. ग्रामीण भागात सरकारी आरोग्य सेवेचा गोंधळ उडाल्याने आदिवासी बांधवाना गुजरातमधील खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागतात. तसेच परिसरातील बोगस डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागतात. तलासरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन कर्मचारी नसल्याने मृताचे शव विच्छेदन करण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवावा लागतो. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मोठी रक्कम मोजावी लागते.
----------
रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती वरिल कार्यालयात पाठवली आहे.
- प्रदीप भारती, वैद्यकीय अधिकारी