
आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोविडसंदर्भात आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. उद्या, २४ डिसेंबर २०२२ पासून ही मार्गदर्शक तत्त्वे प्रवाशांना लागू असतील.
जगातील काही देशांमध्ये कोविडच्या रुग्णसंख्येची झपाट्याने वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने ही पावले उचलली जात आहे. भविष्यातील परिस्थितीनुसार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात येतील. या मार्गदर्शक तत्त्वात आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, तसेच विमानतळावर कोविड नियम पाळण्यासाठी प्रोटोकॉल दिले आहेत.
मार्गदर्शक तत्त्वे
- प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असेल.
- विमानतळावर, विमानात कोविड आणि त्याचा प्रसार न होण्यासाठी उपायांसंदर्भात माहिती द्यावी.
- विमानात कोविडची लक्षणे दिसणाऱ्या प्रवाशाला मानक प्रोटोकॉलनुसार विलगीकरण कक्षात ठेवावे.
- विमानतळावर आगमन करणाऱ्या प्रवाशांच्या रांगेमध्ये सामाजिक अंतर सुनिश्चित करून डी बोर्डिंग केले पाहिजे.
- विमानतळावर सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक.
- स्क्रीनिंगदरम्यान लक्षणे आढळलेल्या प्रवाशांना ताबडतोब विलगीकरण कक्षात नेले जाईल.
- प्रवाशांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्यास, त्यांचे नमुने पुढे जीनोम तपासणीसाठी पाठवावेत.
- १२ वर्षांखालील मुलांना आगमनानंतरच्या चाचणीमधून सूट देण्यात आली.
- मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास, त्यांची चाचणी केली जाईल आणि प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.