सीएसएमटी स्थानकात पुन्हा वॉटर व्हेंडिंग मशीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसएमटी स्थानकात पुन्हा वॉटर व्हेंडिंग मशीन
सीएसएमटी स्थानकात पुन्हा वॉटर व्हेंडिंग मशीन

सीएसएमटी स्थानकात पुन्हा वॉटर व्हेंडिंग मशीन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : तब्बल अडीच वर्षांनंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा अत्याधुनिक वॉटर व्हेंडिंग मशीन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना किफायतशीर दरात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. सीएसएमटी स्थानकावर पाच मशीन सुरू झाल्या असून उर्वरित स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

मुंबईत दररोज उपनगरीय लोकलमधून ७५ लाख; तर लांब पल्ल्याच्या गाड्यांनी लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सर्वाधिक व्यस्त विभागामध्ये शहराचा समावेश होते. या प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी रेल्वेने पाणपोयांची सोय असली, तरी अनेक स्थानकांत त्या बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि किफायतशीर दरात पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून ‘आयआरसीटीसी’ने ‘रेलनीर’चा बॉटल पर्याय प्रवाशांना उपलब्ध करू दिला होता. त्यापाठोपाठ वॉटर व्हेंडिंग मशीनसुद्धा सुरू केल्या होत्या; मात्र त्या गेल्या अडीच वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना ‘रेलनीर’च्या पाण्याचा बॉटल घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता; मात्र आता मध्य रेल्वेने नॉन-फेअर रेव्हेन्यू योजनेअंतर्गत मुंबई विभागात १७ वॉटर व्हेंडिंग मशीन लावण्यात येणार आहेत.

पाणी दर (रुपयांत)
पाणी बाटलीसह विनाबाटली
३०० मिली ८ ५
५०० मिली १२ ८
१ लिटर १५ १२

स्थानकांतील व्हेंडिंग मशिनी
दादर ५
ठाणे ४
कुर्ला १
घाटकोपर १
विक्रोळी १

डिजिटल पेमेंट सुविधा
मेघदूत वॉटर व्हेंडिंग मशीन अत्याधुनिक आहे. ही सेवा २४ तास सुरू असणार आहे. या मशीनला डिजिटल देयकासाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मोबाईल ॲप्लिकेशनमधून तो स्कॅन करून पाणी खरेदी करता येणार आहे, असे वॉटर व्हेंडिंग मशीनचे निरीक्षक प्रफुल कदम यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

रेल्वेला मिळणार महसूल
मध्य रेल्वेने वॉटर व्हेंडिंग मशीनकरिता एका खासगी कंपनीला पाच वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. दर वर्षी एका यंत्रासाठी दीड लाख याप्रमाणे २५ लाख ५० हजार रुपये रेल्वेला महसूल मिळणार आहे.