आरोग्य विभागाला सतर्कतेचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभागाला सतर्कतेचे निर्देश
आरोग्य विभागाला सतर्कतेचे निर्देश

आरोग्य विभागाला सतर्कतेचे निर्देश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : चीनसह जपान, फ्रान्स देशात कोरोनाचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची आज (ता.२३) तातडीने बैठक घेतली. यात शहरात दैनंदिन कोविड चाचण्या आणि लसीकरणाचा आढावा घेतला.

चीनमध्ये ओमिक्रॉनच्या बीएफ- ७ या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असून भारतातही गुजरात व ओडिशा राज्यात चार रुग्ण आढळून आले आहेत. कोविडच्या मागील लाटेबाबतचा आढावा घेऊन यापुढील काळात आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोविडचा धोका अजून टळलेला नाही, असा संदेश नागरिकांमध्ये पोहोचवण्याची गरज असल्याचेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर व अँटिजेन चाचण्यांची संख्या कमी असून दिवसाला २००० पर्यंत चाचण्या करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. कोविड चाचण्यांच्या माध्यमातून कोविडचा किती प्रसार झालेला आहे ते वस्तुनिष्ठपणे कळू शकते. त्या माध्यमातून कोविडचा प्रसार वाढत आहे किंवा कसे हे योग्यवेळी कळेल, या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन्स या ठिकाणीही कोविड चाचण्या सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या. सॅम्पल घेतल्यापासून २४ तासांच्या आत रिपोर्ट येणे अत्यंत आवश्यक आहे. कोविड लसीकरणावर भर देत असतानाच रुग्णालयातील औषधांची उपलब्धता, ऑक्सिजनच्या पुरेशा टाक्या, बेड आदींची तयारी ठेवावी, असेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, जागतिक स्तरावरील कोविडची स्थिती पाहता आपण अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. धोका अद्याप टळलेला नाही, हे लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.
.................
मूलभूत सेवा-सुविधांचे ऑडिट करणे
कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील मूलभूत सेवा सुविधांची पाहणी करण्यात यावी. यामध्ये ऑक्सिजन, फायर, स्ट्रक्चरल, विद्युतीकरण व पाणीपुरवठा आदी सेवासुविधांचे ऑडिट करून आवश्यकता असल्यास त्याचे काम करण्यात यावे. जेणेकरून आगामी काळात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लवकरच कोविड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. त्यानुसार तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील आयुक्तांनी दिल्या.