उद्यापासून मुंबई विमानतळावर कोरोना नियमावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यापासून मुंबई विमानतळावर कोरोना नियमावली
उद्यापासून मुंबई विमानतळावर कोरोना नियमावली

उद्यापासून मुंबई विमानतळावर कोरोना नियमावली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : जगातील काही देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने कोविड विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शनिवारपासून (ता. २४) मुंबई विमानतळावर कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

कोरोना संदर्भात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विमानतळाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एकत्रित उपाययोजना केल्या आहेत. २४ डिसेंबरपासून अंमलात आणलेल्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे, मुंबई विमानतळ येथे येणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांना विमानतळावर पोस्ट-अरायव्हल चाचणी करावी लागेल. अशा प्रवाशांना त्यांच्या संबंधित विमानांद्वारे ओळखले जाईल आणि त्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी एअरलाइन्सच्या कर्मचार्यांनी टर्मिनलच्या एका समर्पित भागात मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रवाशांनी नमुने सादर करणे आणि पुढील प्रवास सुरू ठेवणे आवश्यक आहे. चाचणी निकालांची डिजिटल प्रत थेट प्रवाशांना पाठवण्याची तरतूद प्रयोगशाळेने केली आहे.

चोवीस तास विनामूल्य चाचणी
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी सुविधा आरोग्य तपासणी काउंटरनंतर, प्री-इमिग्रेशन परिसरात, आंतरराष्ट्रीय आगमन कॉन्कोर्समध्ये असणार आहे. प्रवाशांसाठी चाचणी सुविधा चोवीस तास विनामूल्य उपलब्ध असणार आहे. प्रशासनाने कोविड-१९ चाचणीसाठी आयसीएमआर आणि एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा नियुक्त केली आहे. विमानतळाने कोविड-१९ चाचणी प्रक्रियेसाठी सहा नोंदणी काउंटर आणि तीन सॅम्पलिंग बूथची व्यवस्था केली आहे. प्रतिबंधात्मक उपायांवरील संदेश आणि नवीनतम सूचना प्रवाशांना टर्मिनल आणि सीएमएमआयएच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे.