नाताळच्या स्वागतासाठी जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाताळच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
नाताळच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

नाताळच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

sakal_logo
By

नाताळचे स्‍वागत जल्‍लोषात
तुर्भे, ता २४ (बातमीदार) : नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल्स व शहराबाहेरील पर्यटन स्थळे सज्ज झाली आहेत. पर्यटकांनी आधीच हॉटेल, व्हिला, बंगले, टेंट हाऊसचे बुकिंग केले आहे. बहुतांश हॉटेल्‍स हाउसफुल असून सेकंडहोम असलेले बंगले व जलाशयालगत, समुद्र किनाऱ्यांवर असलेल्या कृषी पर्यटन केंद्रावरील तंबूंची बुकिंगही हाऊसफुल आहे. अलिबाग, पुणे, कोकण, गोवा आदी ठिकाणची पर्यटन स्थळे नाताळ साजरा करण्याबरोबरच सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाच्या स्‍वागतासाठी सज्ज आहेत.
शहरातही नव्या वर्षाच्या स्वागताचा माहोल तयार होऊ लागला आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये ‘थर्टी फर्स्ट’साठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे बेत आखले जात आहेत. गीत, संगीत व नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विधायक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सरसावत आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून खवय्यांसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पॅकेजच्या घोषणाही होत आहेत. यामध्ये जेवणासह सांस्‍कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाची मजेवानी आहे.
शहरातील हॉटेल व्यावसायिकांचीही नववर्ष स्वागताची लगबग सुरू आहे. सजावट, विद्युत रोषणाईचा झगमगाट, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची जाहिरात करून खवय्यांना आकर्षित करण्याचे फंडे योजले जात आहेत. या वर्षीही हा ट्रेंड पाहावयास मिळत आहे. गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिक एकत्र येऊन थर्टी फर्स्टचे नियोजन करीत आहेत. तर बच्चे कंपनीही वर्गणी गोळा करून सेलिब्रेशनची तयारी करीत आहेत.
दरम्यान, शहरालगतच्या ऐतिहासिक व धार्मिकस्थळी सहली तसेच इतर पर्यटनस्थळांना भेटीचे नियोजन करण्यात येत असल्याने आतापासूनच मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू झाले आहे.
गर्दी कॅश करण्यासाठी व खवय्यांना आकर्षित करून घेण्यासाठी हॉटेल व्यावसायिक प्रयत्नशील आहेत.

हॉटेलचालकांकडून सवलतींची बरसात
२५ ते १ जानेवारी या कालावधीत बहुतांश शाळांना सुट्या असतात. नाताळ सण साजरा झाला की, नवीन वर्षाच्या स्वागताच्या धामधुमीला सुरुवात होते. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत एकत्रितपणे करण्याची पद्धत रूढ होत आहे. नागरिकांची होणारी गर्दी विचारात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पेशल ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. जोडप्यांसाठी वेगळी तर कुटुंबासाठी वेगळी व्यवस्‍था ठेवण्यात आल्या आहेत. काही हॉटेलने खास पॅकेज ठरवले असून यात स्‍टार्टर, भरपेट खाद्य, विविध कार्यक्रमांबरोबरच आकर्षक भेटवस्‍तूही दिल्‍या जाणार आहेत.