दिवा डम्पिंग कोण बंद करणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवा डम्पिंग कोण बंद करणार?
दिवा डम्पिंग कोण बंद करणार?

दिवा डम्पिंग कोण बंद करणार?

sakal_logo
By

दिवा, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. महापालिकेत सध्या आयुक्त प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. राज्याचे कारभारी असणारे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोघांचीही दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे अशी मागणी आहे, भावना आहे. दोघे सत्तेत असूनही डम्पिंग बंद करू शकत नाहीत, अशी एकंदरीत स्थिती असताना, हे डम्पिंग बंद करणार कोण, हा गंभीर प्रश्न दिवेकरांसमोर आहे.
मागील अनेक वर्षांपासून राजकीय पक्षांपेक्षा दिव्यातील सामान्य नागरिक डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी करत आहेत. या मागणीला राजकीय पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. राजकीय पक्षांची तशी आंदोलने झाली आहेत. प्रत्यक्षात दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद होण्याची आश्वासनेच नेहमी दिव्यातील आंदोलन करणाऱ्यांना मिळालेली आहेत. दिवा शहरात असणारे हे डम्पिंग ग्राऊंड भागातील वृद्ध, गर्भवती स्त्रियांना, लहान मुलांना दम्याचे, श्वसनाचे, डोळ्याचे आणि त्वचेचे विविध आजार होण्यास कारणीभूत ठरले आहे. डम्पिंग ग्राऊंडमधून निघणारे धुराचे लोळ हे येथील नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहेत. मागे काही वर्षांपूर्वी विषारी वायू गळती याच डम्पिंग ग्राऊंडवर झाल्याने दिव्यातील नागरिकांना खूप त्रास झाला होता.
......................
भाजपचे आंदोलन हेच आश्चर्य
शहराच्या इतक्या जवळ असणारे हे डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या तेव्हाची शिवसेना आणि आताची बाळासाहेबांची शिवसेना यांनी दिव्यातील जनतेला दिले होते. डम्पिंग ज्यावेळी सुरू झाले त्यावेळी महापालिकेत भारतीय जनता पार्टी सुद्धा तत्कालीन शिवसेनेबरोबर सत्तेत होती. आज ठाण्यातील भाजपचे नेते दिव्यात येऊन डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठीचे आंदोलन करतात, हे आश्चर्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.