
सुकी मासळी खरेदीसाठी आठवडी बाजारात झुंबड
विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : विक्रमगडच्या आठवडा बाजारात तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी येत असतात. एकाच ठिकाणी किराणा, अन्नधान्यासह अनेकविध गरजेच्या वस्तू मिळत असल्याने आजही या आठवडा बाजारात गर्दी असते. यात अनेक विक्रेते सुकी मच्छीही विकण्यासाठी येतात. ही सुकी मच्छी घेण्यासाठी आठवडा बाजारात मोठी गर्दी होत आहे; पण या सुक्या मच्छीला महागाईची झळ बसली असून त्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.
प्रत्येक गाव-पाड्यांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारात जीवनावश्यक खरेदीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थांची गर्दी होते; पण महागाईची झळ बसल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. असे असले, तरी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत आहे.
विक्रमगडच्या आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात सुक्या मासळीची खरेदी-विक्री होत आहे. येथे सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदी भागांतून सुकी मासळी घेऊन विक्रेत्या महिला आठवडी बाजारात येत आहेत. ही सुकी मासळी खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील मुख्यत्वे महिलांची एकच झुंबड उडत आहे.
या भागात होतेय विक्री...
आठवडी बाजारात बोंबील, कोलीम, बांगडे, सुरमई, बगीसुकट, मांदिली, सुकट अशा विविध प्रकारचे सुके मासे विक्री केले जात आहेत. पालघर, वसई, सातपाटी, डहाणू, वाणगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. ताजे मासे व्यावसायिक सुकवतात आणि सुकवलेली मासळी विक्रीसाठी घेऊन येतात. या सुक्या माशांची साखरा, दादडे, तलवाडा, आलोंडा, मलवाडा, जव्हार परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.
दरात दुप्पटीने वाढ
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही बसला आहे. यात बोंबीलचे दर किलोमागे दोनशे रुपये वाढलेले आहेत; तर बांगडा, मांदेली, कोलीम, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढलेले दिसत आहेत. असे असले, तरी सुकी मासळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी काही कमी झालेली नाही, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
सुक्या मासळीचे भाव (प्रतिकिलो)
बोंबील ८०० किलो
मांदेली २००-३०० रुपये किलो
कोलीम ६०० किलो
खार १२०० किलो
सोडे १६०० किलो
सुकट ७०० किलो
बांगडा १५ रुपये नग