
संपले इलेक्शन, जपा रिलेशन!
नवीन पनवेल (वार्ताहर)
विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पनवेल तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीदरम्यान राजकीय संबंध ताणल्याने निर्माण झालेल्या द्वेशातून निकालानंतर अनेकदा गैरप्रकारही घडतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी आता सर्वांनीच हार-जीत मान्य करून सर्व हेवेदावे विसरून जावे, यासाठी सध्या सोशल मीडियावर ‘संपले इलेक्शन, जपा आता रिलेशन’ असे संदेश देत राजकीय कटुता संपवण्याचे आवाहन केले जात आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेकांनी हायटेक प्रचार यंत्रणेचा वेगाने वापर सुरू केला होता. अनेकांनी सोशल मीडियावर आपापले ग्रुप तयार करून मतदारांचे मोबाईल क्रमांक गोळा करणे सुरू केले होते. प्रत्येक ग्रुपवर दररोज सकाळी विविध पोस्ट टाकून मतदारांना आकर्षित करण्याचे काम केले. गावोगावी आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला होता. एकमेकांवर अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत आरोपही झाले. सोशल मीडियानेही यात मोठी भूमिका पार पाडली. निवडणुकीदरम्यान विविध राजकीय समीकरणेही जुळून आली, तर काही ठिकाणी बंडखोरीही दिसून आली. त्यामुळे इतर वेळी एकत्र दिसणारे कार्यकर्ते गटा-तटात विभागले गेले. प्रचारातील अनेक किस्से, घटना सोशल मीडियावर व्हायरलही केल्या गेल्या. परिणामी, वैयक्तिक संबंधही ताणले गेले. विरोधी उमेदवारांवर टीका करणाऱ्या डीपी, स्टेट्स ठेवले जात होते. त्याचबरोबर मतदानाच्या आवश्यक करणाऱ्या पोस्टही फिरत होत्या. मात्र, आता गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांनी हेवेदावे विसरावे, यासाठी सोशल मीडियावर ‘संपले इलेक्शन, जपा आता रिलेशन’ असे संदेश देत अनेक जण देत आहेत.
दावे-प्रतिदाव्यांना जोर
निवडणुकीत उभा राहिलेला कार्यकर्ता निवडून यावा; तसेच आपल्या पक्षाच्या विचारांचे पॅनल विराजमान व्हावे, यासाठी पदाधिकारी, नेते धडपडत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत नव्हते. मात्र, निकाल जाहीर होताच वरिष्ठ नेत्यांकडून दावेप्रतिदावे सुरू झाले आहेत. इतके सरपंच आमचे, इतके सदस्य आमच्या पक्षाचे असे जाहीर करण्याची जणू चढाओढ सुरू झाली आहे.
-----------------------------------