
मास्कसाठी शाळांमध्ये जनजागृती
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने भारतात त्याचे लोण पसरायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सावध पावले टाकली आहेत. सर्वच राज्यांना मास्कसक्ती करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आल्याने पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक दीपक हांडे यांनी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कवाटप करून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. घाटकोपरच्या भटवाडी येथील बर्वेनगर शाळेत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मास्कवाटप करण्यात आले. तसेच घाबरून न जाता केवळ मास्क काळजीने वापरा, असे आवाहन माजी नगरसेवक दीपक हांडे यांनी केले. या वेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी तुपे, सहकारी शिक्षक दत्तात्रय गाडेकर, शाखाप्रमुख संतोष साळुंखे, शिक्षिका रजनीगंधा पावसे, साधना साहने आदी उपस्थित होते.