कुडूस नाका अतिक्रमणांच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडूस नाका अतिक्रमणांच्या विळख्यात
कुडूस नाका अतिक्रमणांच्या विळख्यात

कुडूस नाका अतिक्रमणांच्या विळख्यात

sakal_logo
By

वाडा, ता. २४ (बातमीदार) : भिवंडी वाडा मार्गावरील कुडूस नाक्याचा बहुतांश भाग हातगाड्या, टपऱ्या, फळभाजी विक्रेत्यांनी व्यापला आहे; तर उर्वरित भागात वाहने पार्क केली जात असल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. यामुळे कुडूस नाका अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र असून या भागातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
तालुक्यातील कुडूस हे बाजारपेठेचे मुख्य गाव असून ५२ गावांची बाजारपेठ येथे आहे. त्यामुळे कुडुस नाक्यावर मोठ्या संख्येने नागरिकांची ये- जा असते; पण या कुडुस नाक्यावर टपऱ्या, फेरीवाले, भाजी, फळविक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे; तर फूटपाथवर लावल्या जाणाऱ्या टपऱ्यांमुळे गटारे दिसेनाशी झाली आहेत. यामुळे गटारे साफ करता येत नसल्याने पावसात हा रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे या वाढत्या अतिक्रमणावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
कुडूस नाक्यावर रस्त्याच्या कडेला अनेक दुकाने आणि टपऱ्या आहेत. या दुकानात येणारे नागरिक रस्त्यातच गाड्या पार्क करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग, पोलिस खाते आणि ग्रामपंचायतीने अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
....
वाहतूक कोंडी नित्याची
कुडूस नाक्यावर दुचाकी चारचाकी वाहने अस्ताव्यस्त लावत असल्याने येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा नाहक त्रास वाहनचालक व नागरिकांना होत असतो. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे ग्रामस्थ अनिल पाटील यांनी सांगितले.

...
अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात येणार आहेत. त्यानंतरही अतिक्रमणे काढण्यात आली नाहीत, तर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल.
- शशिकांत चौधरी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
...
सध्या भिवंडी वाडा रस्तादुरुस्तीचे काम सुरू असून ते काम पूर्ण झाल्यानंतर नाक्यावर साईट पट्टे मारण्यात येईल. त्यानंतर दुचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल. तसेच येथील वाहतूक कोंडीबाबत ग्रामपंचायत दक्षता घेत आहे.
- डॉ. गिरीश चौधरी, उपसरपंच, ग्रामपंचायत, कुडूस