शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर

sakal_logo
By

खर्डी, ता. २४ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यात जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेंतर्गत १०७ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. इतर नऊ योजनांच्या निविदा नोटिसाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असून येत्या दोन वर्षांत या योजना पूर्णत्वास जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर होणार आहे.
खर्डी ग्रामपंचायतीअंतर्गत पाईपलाईनला ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यासाठी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेंतर्गत चार कोटी ११ लाखांची योजना मंजूर होऊन त्याची निविदासुद्धा काढण्यात आली आहे. यात मुख्य टाकी, आनंदनगर व पंचशील नगर येथे एक लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या अशा तीन टाक्या बांधण्यात येणार आहेत. बेलपाडा, अजमेरा व इतर आदिवासी पाड्यात नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याने येथील पाणीटंचाई कायमची दूर होणार आहे.

-----------------
२०२४ पर्यंत योजना पूर्ण होणार
योजनेद्वारे २०२४ पर्यंत शहापूरच्या घराघरात नळाने पाणी पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला असून आतापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत १०७ पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू करण्यात आले आहे. खर्डी, वालशेत, नडगाव, वासिंद, दळखण, कसारा, अघई, टेंभा व बिरवाडी येथील नऊ पाणीपुरवठा योजनांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ह्या योजनांच्याही निविदा काढण्यात आल्या आहेत.


-----------
८६ गावापाड्यांत योजना
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या दापूर, बाभले, कांभे, गुंडे, दांड, कसारा, उंब्रवणे, खराडे, तुते कोलकेवाडी, पोकल्याची वाडी, सुसरवाडी, घाणेपाडा, वरस्कोल, राड्याचा पाडा, बॅडेकोन, दहीगावसारख्या आदिवासीबहुल भागातील ८६ गावापाड्यांत जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात येत आहे.

---------------
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत काही गावातील कामे सुरू झाली आहेत. योजनेच्या नूतनीकरण करण्याच्या कामाची निविदासुद्धा काढण्यात आली असून लवकरच कामे सुरू करण्यात येतील. त्यामुळे पाणीटंचाईतून शहापूरच्या जनतेची कायमस्वरूपी सुटका होणार आहे.
- विकास जाधव, उपकार्यकारी अभियंता, शहापूर