मानधनावरील संगणक चालक कायम सेवेत ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानधनावरील संगणक चालक कायम सेवेत ?
मानधनावरील संगणक चालक कायम सेवेत ?

मानधनावरील संगणक चालक कायम सेवेत ?

sakal_logo
By

भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून ठोक मानधनावर काम करत असलेले संगणक चालक महापालिकेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत, पण महापालिकेच्या शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधात या पदांचा समावेश केला नसल्यामुळे त्यांना सेवेत कायम केलेले नाही. त्यामुळे परभणी महापालिकेच्या धर्तीवर अधिसंख्य पदांची निर्मिती करून संगणकचालकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर हे सर्व संगणक चालक सेवेत कायम होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने ६२ संगणक चालक व एक लघुलेखक ठोक मानधनावर घेतले आहेत. महापालिकेच्या आकृतिबंध व सेवा शर्ती नियमांना राज्य सरकारने २०१९ मध्ये मान्यता दिली आहे, पण त्यात संगणक चालक व लघुलेखक ही पदे नसल्यामुळे संगणक चालकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेता आलेले नाही. त्यामुळे दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन त्यांना मुदतवाढ द्यावी लागते. मानधानावर काम करत असलेले बहुतांश संगणक चालक दहा ते पंधरा वर्षे काम करत असून ते स्थानिक आहेत. त्यांना महापालिकेच्या कामकाजाची चांगली माहिती झाली असून ते अनुभवीदेखील आहेत. त्यामुळे सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी आहे.

परभणी महापालिकेचा संदर्भ
महापालिकेच्या विविध विभागांच्या जास्तीत जास्त कामांचे संगणकीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ऑनलाईन सेवा देण्यात महापालिका राज्यात अव्वल ठरली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेला कायमस्वरूपी अनुभवी संगणक चालकांची आवश्यकता आहे. आकृतिबंधात ही पदे मंजूर नसल्यामुळे अधिसंख्य पदे निर्माण करून तात्पुरत्या सेवेतील संगणक चालकांना सेवेत कायम करण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती आयुक्त दिलीप ढोले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी परभणी महापालिकेचा संदर्भ देण्यात आला आहे. परभणी महापालिकेतील प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज- २ अंतर्गत मानधनावर काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांना सेवेत कायम करण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याच वर्षी एप्रिल महिन्यात मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर महापालिकेलाही अधिसंख्य पदे निर्मितीसाठी मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी पाठवला आहे.

अधिसंख्य पदे म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ट कामासाठी पदांची निर्मिती करून त्यावर तात्पुरत्या कर्मचाऱ्‍यांना कायमस्वरूपी सामावून घेतले जाते. त्यांना अन्य स्थायी कर्मचाऱ्‍यांप्रमाणेच सर्व फायदे व सुविधा दिल्या जातात; मात्र संबंधित कर्मचारी निवृत्त झाले की ही पदे आपोआपच रद्दबातल होतात. या पदांसाठी अनुकंपा योजनादेखील लागू ठरत नाही.