
वसईत येशू जन्मोत्सवाचा आनंद
प्रसाद जोशी, वसई
वसईत ख्रिस्ती बांधव नाताळ सणाच्या उत्साहात न्हाऊन गेले आहेत. नाताळची पूर्वतयारी जोरात सुरू असून घरोघरी रोषणाई, आकाशकंदील यांच्या मदतीने सजावटीची कामे अंमित टप्प्यात आली आहेत; तर वसईतील सर्व चर्चला नाताळनिमित्त रंगरंगोटी करण्यात आली आहे. येशूचा जन्म एका गोठ्यात झाल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गोठ्याची तयारी करण्यात तरुण मंडळी मग्न झाले आहेत.
येशूचा जन्म २५ डिसेंबर रोजी मध्यरात्री झाला. त्यामुळे या दिवसाचा उत्सव ख्रिस्ती बांधवांमध्ये महत्त्वाचा आणि श्रद्धेचा मानला जातो. वसई पश्चिम भागात नंदाखाल (१५७३ ), पापडी (१५८२), निर्मळ (१५५६), सांडोर (१५६८) या पुरातन चर्चसह वसई गाव, गिरिज, रमेदी, होळी, भुईगाव, गास, वाघोली, उमराळे, बोळिंज, आगाशी, नानभाट, नंदाखाल, देवतलाव, नानभाट, वसई गाव पाचूबंदर आदी परिसरातील चर्चना रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांनी वसई तालुक्यात नाताळ सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. या नाताळ सणासाठी वसई-विरारमध्ये जल्लोषाचे वातावरण असून बाजारपेठादेखील सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसह व्यापारीवर्गात आनंद निर्माण झाला आहे.
--------------
व्यापारी आनंदात
वसई तालुक्यात नाताळ सणाला लागणाऱ्या विविध प्रकारच्या केकसह इतर साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे व्यापारीवर्गासह छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-----------------
केकला अधिक मागणी
चॉकलेटसह विविध फ्लेवर असलेले केक बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मित्र, नातेनाईकांना भेट देण्यासाठी केक मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. तसेच ख्रिस्ती बांधव घरीदेखील केक तयार करत आहेत.
---------------------
ज्येष्ठांपासून लहानगेही तयारीत मग्न
ज्येष्ठांपासून ते बच्चेकंपनी सजावटीच्या कामात मग्न झाले आहेत. यात घराच्या अंगणात गोठा बनवणे, ख्रिसमस ट्री तयार करण्यासह घरात रोषणाई करण्यात येत आहे. यात घरातील सर्व सदस्यांना हातभार लावत असल्याने चिमुकल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
-------------------
गोठ्याची तयारी
येशूचा जन्म हा एका गोठ्यात झाला अशी गाथा आहे. त्यांनी मानवतेचा संदेश जगाला दिला. त्यामुळे गावोगावी गोठा तयार करण्यात येत आहे. युवकांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. या गोठ्याच्या माध्यमातून पर्यावरणासह विविध सामाजिक एकोपा जपणारे संदेश देऊन येशूची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-----------------
हॉटेल सजली
नाताळ ते नववर्ष या दिवसांत नागरिकांची हॉटेलमध्ये गर्दी होते. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल सज्ज झाली आहेत. यासाठी हॉटेलमध्ये रोषणाई करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत भागात आकर्षक सजावट केली आहे. कोरोनाकाळात आलेली मंदी व त्यामुळे झालेले नुकसान पाहता यंदा व्यवसाय चांगला होईल, अशी आशा हॉटेलचालकांना आहे.
------------------
प्रभू येशूने मानवता धर्माची शिकवण तसेच शांतीचा संदेश दिला. त्याच मार्गाने पुढे जावे, यासाठी प्रयत्न करतो. नाताळ सणानिमित्त रंगरंगोटीसह आकर्षक सजावटीने घर सजवले आहे. येशू जन्मोत्सव हा आमच्यासाठी विचारांना प्रेरणा आणि नवी ऊर्जा देणारा असतो.
- अॅड. जॉर्ज फरगोस, ख्रिस्ती बांधव, गास गाव