ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी चर्च सजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी चर्च सजले
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी चर्च सजले

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी चर्च सजले

sakal_logo
By

भारती बारस्कर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबईत ख्रिसमसचा माहोल तयार झाला आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. ख्रिस्ती बांधवांच्या लोकवस्तीत सर्वत्र रोषणाई पाहायला मिळत असून ख्रिसमसच्या पूर्वसंध्येलाच मुंबईतील ख्रिस्ती वस्त्यांबरोबरच चर्च, हॉटेल्स, मॉल्समध्येही मोठ्या उत्साहात ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले जात आहे.

ख्रिसमसच्या दोन ते तीन दिवस आधीपासूनच सेलिब्रेशनची सुरुवात होते. यंदादेखील कोरोनाच्या व्हेरिएंटचे सावट या उत्‍सवावर असून नियमांच्या चौकटीत राहून ख्रिसमस सण साजरा करण्यात येत असल्‍याचे पाहायला मिळत आहे. दरम्‍यान, ख्रिसमस केकची मागणी वाढली असून अनेक दुकानदारांनी केकसोबत मास्क, चॉकलेट फ्री अशा काही ऑफर ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील उपनगर भागात ख्रिश्चन बांधवांच्या लोकवस्त्या आहेत. त्यात कांजूरमार्ग येथील कांजूर गाव, भांडुप गाव, कुर्ला पश्चिमेकडे ख्रिश्चन गाव, वांद्रे पूर्व-पश्चिम परिसर, गिरगावातील खोताची वाडी, सांताक्रूझ, बोरिवली येथील काही परिसर, विक्रोळी पश्चिम, डॉकयार्ड रोड, दादर परिसर, म्हातारपाखडी या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांची वस्ती आहे. त्यामुळे या परिसरात खास पारंपरिक पद्धतीने ख्रिसमस साजरा करण्यात येत आहे. अनेक तरुण-तरुणी ख्रिसमसचे सेलिब्रेशन पाहण्यासाठी या परिसरात गर्दी करत आहेत.
संध्याकाळी ख्रिस्ती वस्त्यांतून फेरफटका मारताना गिटार, पियानोचे सूर कानावर पडतात आणि त्याचबरोबरीने ‘जिंगल बेल जिंगल बेल, जिंगल ऑल द वे’, ‘विश यू ए मेरी ख्रिसमस’ अशा कॅरल्सचे शब्द कानावर पडत आहेत. घराघरांमध्ये तयार होणाऱ्या फराळात केक आणि चॉकलेटला जास्त महत्त्‍व असल्याने अनेक केक शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिसमस केक घेण्यासाठी ख्रिस्ती बांधव गर्दी करत आहेत.

खोताची वाडी सज्‍ज
गिरगावातल्या खोताची वाडी ख्रिसमससाठी सज्‍ज आहे. या वाडीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्‍सव साजरा करतात. परदेशात स्थायिक झालेले नागरिक खास करून ख्रिसमससाठी खोताच्या वाडीत येतात. २५ डिसेंबरला सायंकाळी वाडीत सांताक्लॉज येतो. वाडीतील लहान मुले, मोठी माणसेही त्याच्याबरोबर गाणी म्हणत, नाचत वाडीभर फिरतात.

केक शॉप सजले
मुंबईत शॉपिंग मॉल्स, मोठमोठे पार्लर या ठिकाणी नेल आर्टची दुकाने नटलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे या सणात केक आणि चॉकलेटला जास्त महत्त्‍व असल्याने केकची मागणी वाढली आहे; तर नव्या कोरोनाचे संकट असल्याने केक शॉप मालकांनी विशेष काळजी घेत ऑनलाईन केक बुकिंग व्यवस्था सुरू ठेवली आहे; तर केकसोबत मास्क, चॉकलेट फ्री अशी ऑफरदेखील ठेवण्यात आली आहेत, असे शिवडीतील केक शॉपचे सेलिब्रेशन झोन केक शॉपचे राहुल झोडगे यांनी सांगितले.

घरोघरी सजावट
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसचे वेध लागलेले असतात. प्रत्येक घरात खास सजावट केली जाते. त्यात ख्रिसमस ट्रीला विशेष महत्त्व आहे. घराच्या एका कोपऱ्यात, बाल्कनीमध्ये ख्रिसमस ट्री उभे करण्यात येतात. ही ख्रिसमस ट्री हिरव्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये असतात. ख्रिसमस ट्रीला लायटिंग केले जाते. त्यावर स्टीक्स, बॉल, बेल्स, सॉक्स, स्टारर्स, छोटा सांताक्लॉज, छोटे गिफ्ट बॉक्स लावून सजवण्यात येते. ‘ख्रिसमस ट्री’ गिफ्ट्स ठेवण्यात येतात. येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला असल्यामुळे सजावटीचा एक भाग म्हणून घरात प्रातिनिधिक स्वरूपाचा गोठा तयार करण्यात येतो. वाळलेले गवत, पुठ्ठा, लाल माती, पुतळ्याचा वापर करून सजवला जातो. येशूच्या जन्माचा प्रसंग या गोठ्याच्या रूपात उभा केला जातो. या गोठ्यात येशूची आई मारिया, वडील, लहान येशू, मेंढ्या, गायी यांचे पुतळे ठेवण्यात येतात. ख्रिसमससाठी घराच्या बाहेर स्टार (चांदणी) लावण्यात येते. घराला रोषणाई करण्यात येते.

युवकांच्या कॅरल्स
ख्रिसमसनिमित्त तरुणांच्या कॅरल्स पार्टी रंगतात. युवक व युवती समूहाने आपल्या परिचितांकडे जाऊन तेथे एकमेकांना शुभेच्छा देतात. तसेच येशू ख्रिस्ताची स्तुती गातात. शहरातील सर्वच चर्चमधील तरुण-तरुणी या कॅरल्समध्ये सहभाग घेतात.

वारली सजावटीची ख्रिसमस ट्री शिल्पाकृती
मुंबई, ता. २४ ः देशभरातील आयटीसीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये यंदा स्थानिक लोककलाकारांनी तयार केलेले वेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री सजवण्यात आले असून अंधेरीच्या आयटीसी मराठा हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग व पालघर येथील आदिवासी कलाकारांनी वारली कलेच्या साह्याने सजवलेले ख्रिसमस ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एरवी परंपरागत ख्रिसमस ट्री ला विविध भेटवस्तू तसेच शोभेच्या बाबींनी सजवले जाते, पण या वेळी प्रथमच येथे अशा प्रकारचे वेगळे ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. आयटीसी मराठामधील या ख्रिसमस ट्री ला शिल्पाकृती हे नाव देण्यात आले आहे. सिंधुदुर्गमधील चिवार या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी हा ख्रिसमस ट्री तयार केला आहे. हा १८ फूट उंच ख्रिसमस ट्री मोठ्या टोपीच्या आकाराचा असून त्याच्यावर वारली पद्धतीच्या चित्रकलेची नक्षी आहे. यासाठी सुमारे ४५ कलाकारांनी श्रम केले आहेत. विशेष म्हणजे ही कलाकृती शंभर टक्के पर्यावरणपूरक अशा बांबूच्या साह्याने तयार करून तिला वारली चित्रकलेने सजवण्यात आले आहे.
येथे वारली कलाकृती तसेच बांबूच्या विविध गोष्टी यांचे विक्री प्रदर्शनही मांडण्यात आले आहे. यातून मिळणारे उत्पन्न आदिवासींच्या हितासाठी काम करणाऱ्या चिवार फाऊंडेशनला दिले जाईल. ३१ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुले राहील.