
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात मास्कची सक्ती
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून पुन्हा लाट येण्याची शक्यता आहे. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. २६) मास्कची सक्ती आणि पाच फुटांचे अंतर याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी विजय पाटील यांनी दिली.
मंदिरात एरव्ही दर्शनासाठी भाविकांची संख्या कमी असते. मात्र सोमवारी ही संख्या दोन हजाराच्या घरात असते. कोरोनाच्या लाटेची शक्यता आणि त्याचा फैलाव होऊ नये, म्हणून अतिदक्षतेच्या दृष्टिकोनातून मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच भाविकांनी दर्शनासाठी पाच फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. भाविकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून प्रथम त्याचा वापर करूनच दर्शनाच्या रांगेत उभे राहावे लागणार आहे. सोमवारपासून नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू करण्यात येणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंदिराचे सेवाधारी तैनात केल्याची माहिती पाटील यांनी दिली.