मुसारणे येथे गणितोत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुसारणे येथे गणितोत्सव साजरा
मुसारणे येथे गणितोत्सव साजरा

मुसारणे येथे गणितोत्सव साजरा

sakal_logo
By

वाडा, ता. २४ (बातमीदार) : थोर गणितज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसारणे येथे गणितोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुरुवातीला विद्यार्थ्यांना श्रीनिवास रामानुजन यांच्या महान कार्याबद्दल माहिती सांगण्यात आली. रामानुजन यांनी गणित विषयात केलेली भरीव कामगिरी विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या परिसरात गणित ही संकल्पना घेऊन गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गणिती आकार काढून रांगोळी काढली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी बनवलेले विविध साहित्य या ठिकाणी मांडले होते. यामध्ये संख्याज्ञान, एकक-दशक संकल्पना, संख्यांचे विस्तारित रूप, संख्यांचा लहान मोठेपणा, घड्याळ, विविध भौमितिक आकार, पाढे, वर्तुळ, कोनाचे प्रकार, परिमिती व क्षेत्रफळ इत्यादी विषयावरील साहित्यांचा समावेश होता. पालकांनी सर्व स्टॉलला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांना विविध प्रश्न विचारले. मुलांनी पालकांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली.
पालकांसाठीही काही गणिती कोड्यांचे या जत्रेत आयोजन करण्यात आले होते. सर्व पालकांनी मोठ्या उत्साहाने त्यात भाग घेतला. सर्व मुलांनी श्रीनिवास रामनुजन यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपली पुढील वाटचाल करावी, तसेच गणित विषयाला आपला आवडीचा विषय बनवावा, अशी इच्छा गावच्या सरपंच राजश्री सातवी यांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पिनेश जाधव व सहशिक्षक रमेश शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.