उपद्रवी रानमोडीचा व्याप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपद्रवी रानमोडीचा व्याप
उपद्रवी रानमोडीचा व्याप

उपद्रवी रानमोडीचा व्याप

sakal_logo
By

वसंत जाधव, नवीन पनवेल
सध्या संपूर्ण तालुका रानमोडी या तणामुळे व्यापला असून, त्याच्या उच्चाटनाची मोहीम सरकारने प्राधान्याने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. पनवेलचा पूर्व ग्रामीण भाग, कर्नाळा अभयारण्य व जंगल परिसरात स्थानिक गवताच्या जागी विदेशी रानमोडीसारखे तण वेगाने अतिक्रमण करत आहेत.
पनवेलच्या ग्रामीण भागासह शहरी भागात रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर दिसणारी सफेद फुले, हिरवीगार पाने अन्‌ पांढऱ्या बियांचा फुलोरा असलेले हे झुडूपे दिसून येत आहेत. ती झुडपे शोभेची नसून ती परदेशी तण आहे. युपॅटोरियम ओडोरॅटम्‌ (रानमोडी/जंगलमोडी) असे शास्त्रीय नाव असलेल्या या विदेशी तणाची आहेत. या गवताचे बीज १९७२ च्या दुष्काळात आयात केलेल्या धान्याबरोबर आल्याचे मानले जाते. कारण तत्पूर्वी अशा प्रकारचे गवत आपल्याकडे नसल्याचे ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पाटील सांगत आहेत. केवळ पनवेल परिसरच नाही; तर उर्वरित महाराष्ट्रातही या तणाचे लोण पसरले आहे. ग्रामीण भागासह पनवेल शहरातील वसाहतीमधील मोकळ्या जागांवर ते गतीने वाढत आहे. हे तण वेळीच निर्मूलन झाले नाही; तर शेतीला अन्‌ जंगलाला पर्यायाने जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पनवेल वन विभागाचे अधिकारी डी.एस. सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या वनस्पतीविषयी अनभिज्ञ असल्याचे त्यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

वेगाने प्रसार
दक्षिण अमेरिका, मेक्‍सिको, कॅरिबियन बेटे, आशिया, पश्‍चिम आफ्रिका, ऑस्ट्रेलियात ते आढळते. हे गवत सूर्यफुलाच्या कुळातील युपॅटोरियम ओडोरॅटम्‌च्या अनेक प्रजातींमधील आहे. प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पतीशास्त्रज्ञ यांच्यासह अनेक निसर्ग अभ्यासकांनी त्याला दुजोरा दिला आहे. या तणाला असंख्य बिया येतात. बिया पक्व झाल्या की, फुलोऱ्याच्या साह्याने वाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होण्यास सुरुवात होते. जनावरे, पक्षी या तणाला हात लावत नाहीत. खातही नाहीत. विशेषत: पावसाळा अन्‌ हिवाळ्यात ते अधिक गतीने वाढत जाते. तिचे परागकण व बारीक पाकळ्या मोठ्या प्रमाणावर हवेत पसरत असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रासही होतो. पावसाळा संपल्यानंतर अनेक झुडपे आणि विविध प्रकारच्या गवताची वाढ थांबते किंवा मरण पावतात. परंतु रानमोडीची दाट हिरवाई कायम आहे. हिच्या झुडूपावर ९० ते ८० हजार बिया तयार होतात. ते २० फुटांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे ते अतिशय वेगाने पसरत आहे.

शेतीसह पशुपालन व्यवसायाला धोका
पनवेल शहरातील व वसाहतीच्या मोकळ्या जागांत, माती-कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हे गवत आढळत आहे. अगदी शेतातील बांधावर, कुरणांत हे तण पसरत चालले आहे. त्यामुळेच भविष्यात या तणामुळे ग्रामीण भागातील गवत नष्ट होईल. थोड्या फार प्रमाणात शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसायही संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

रानमोडी ही परदेशी वनस्पती दक्षिण अमेरिकेतून आली आहे. ती निरोपयोगी असून अन्य स्थानिक झाडे आणि गवताच्या वाढीसाठी अडथळा ठरत आहे. जैवविविधतेलाही तिच्यामुळे धोका निर्माण होत आहे. रानमोडीमुळे स्थानिक गवताच्या प्रजाती आणि इतर पावसाळी वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होत आहे. ही वनस्पती हायली फ्लेमेबल असल्याने वणवा लागल्यावर ती अधिक जलद पसरवण्याचे काम या वनस्पतीमुळे वाढले आहे.
- मीनेश गाडगीळ, कृषीभूषण, सेंद्रिय शेती संशोधक, पनवेल