सहकारी बँकावर आजही लोकांचा विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी बँकावर आजही लोकांचा विश्वास
सहकारी बँकावर आजही लोकांचा विश्वास

सहकारी बँकावर आजही लोकांचा विश्वास

sakal_logo
By

विरार, ता. २४ (बातमीदार) : सहकार क्षेत्रातील बँकांवर आजही नागरिकांचा विश्वास आहे. लोकांच्या विश्वासावर हे क्षेत्र विस्तारत आहे. सरकारच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज (ता. २४) वसईमध्ये केले. ते वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

वसईचे आणि माझे नाते जुने आहे. हे माझे आजोळ; तसेच इथेच माझी सासुरवाडी आहे. त्यामुळे येथील विकास आणि सहकार क्षेत्राची मला माहिती आहे. एखादी सहकारी संस्था काढणे सोपे आहे; पण ती संस्था टिकवणे कठीण आहे. लोकांच्या विश्वासावर सहकार चळवळ मोठी झाली आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेण्याचे काम मी करत आहे. वसई जनता बँकेवर सभासदांच्या असलेल्या विश्वासाच्या जोरावर बँकेने ५० वर्षे पूर्ण केली आहेत. संस्थेला कुटुंबाचा दर्जा देऊन काम होत नाही, तोपर्यंत त्या संस्थेची प्रगती होणार नाही. राष्ट्रीय बँका जे काम करत नाहीत, ते काम सहकारी बँका करत असल्याने लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष महेश देसाई, माजी महापौर प्रवीण शेट्टी, नारायण मानकर, बबनशेठ नाईक, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत, बेसिन कॅथॉलिक बँकेचे अध्यक्ष रॉयन फर्नांडिस, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक आदी उपस्थित होते.

तक्रारींची शहानिशा करावी
वसई तालुक्यातील सहकार चळवळीला अजूनपर्यंत गालबोट लागलेले नाही. बँकांनी ग्राहकाला कर्ज देताना आपण त्याच्यावर उपकार करतो, या भावनेने कर्ज देऊ नये. बँकांबाबत सहकार मंत्रालयाकडे तक्रारी आल्यास त्याची शहानिशा करूनच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बोलताना अतुल सावे यांच्याकडे व्यक्त केली.