
वाड्यात रानडुकरांची दहशत
वाडा, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील पेठरांजणी या गावातील शेतजमिनीत शेतकऱ्यांनी भाजीपाला व मका शेती केली आहे. या शेतीत रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून पिकाची नासधूस केली आहे. या रानडुकरांचा बंदोबस्त करून नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वैभव रोहीदास ठाकरे या शेतकऱ्याने तहसीलदार, वनक्षेत्रपाल व कृषी कार्यालयाकडे केली आहे.
ऐनशेत येथील शेतकरी वैभव ठाकरे यांची नजीकच्या पेठरांजणी गावाच्या हद्दीत शेतजमीन आहे. या जागेत भेंडी, कोबी, फ्लॉवर, गवार आदी भाजीपाला दोन एकर जागेत त्यांनी लावला आहे; तर दोन एकर जागेत मका पेरला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून रानडुकरांनी शेतात येऊन पिकांची नासधूस करून संपूर्ण पिक खाऊन टाकले आहे. भातशेतीला जोडधंदा म्हणून वैभव यांनी भाजीपाला लागवड केली होती; मात्र रानडुकरांनी ते सर्व खाऊन टाकल्याने त्यांचे ९० हजारांच्या आसपास नुकसान झाले आहे.