ऐरोलीत आज जुने खेळ रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोलीत आज जुने खेळ रंगणार
ऐरोलीत आज जुने खेळ रंगणार

ऐरोलीत आज जुने खेळ रंगणार

sakal_logo
By

वाशी, बातमीदार
संगणकीय खेळ, व्हिडीओ गेम्स आणि मोबाइल अ‍ॅप्स व कार्टून मालिकांनी भारतीय बालमनावर गारूड केले असताना जुने ते सोने म्हणत आपला कट्टा सामाजिक संस्थेच्या वतीने २५ डिसेंबरला ऐरोली येथे ''चला खेळ खेळूया'' या कार्यशाळेत बैठ्या आणि मैदानी खेळ उत्सवाचे आयोजन केले आहे. ऐरोली सेक्टर पाच येथे सकाळी ८ आठ वाजता भास्कर घाडी मैदान येथे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
पकडापकडी, लपाछपी, विटी-दांडू, भवरे, गोट्या, लगोरच्या, डुक्कर मुसंडी, काठ्या काठ्या, खांब खांब खांबोळी अशा पारंपरिक खेळांचा समावेश असून, प्राचीन काळातील मोक्षपट, मंकला, पगाडीपट, नवकंकारी, चल्लसआठ, बागचाल, चतुरंग, विमानम, प्रेतवा अशा खेळांची ओळखही करून दिली जाणार आहे. अनेकांना जुन्या बैठ्या खेळांची माहिती नाही आणि मुलांना मैदानी खेळ खेळायला मैदाने नाहीत, अशा द्विधा मन:स्थितीत अडकलेल्या नव्या पिढीला आपला कट्टा या संस्थेने जुन्या खेळांचा खजिना शोधून आणला आहे. ऐरोलीमध्ये या खजिन्याची पोतडी खुली केली जाणार आहे. यासाठी कोकण इतिहास परिषदचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर प्रमुख पाहुणे म्हणून तर लेखिका, कला दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रकार डॉ. कलाश्री मंगेश बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
टीव्ही, संगणक, मोबाइलवर पाहिल्या जाणाऱ्या बालमालिकाही केवळ हिंसा, द्वेष, मत्सर आणि कुरघोडी दाखवत असल्याने त्याचा मनावर होणारे संस्कार प्रदूषित झाले आहेत. त्यासाठीच मैदानी व बैठ्या खेळात एक आशय लपल्याची जाणीव आपला कट्टाने करून देण्यास सुरुवात केली आहे. पंकज भोसले आणि त्यांचे सहकारी खेळांचे प्रात्याक्षिक दाखवून मुलांकडून हे खेळ करून घेत आहेत. अधिक माहितीसाठी ९८२१००९१३७, ९७३०९७७५७९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.