हिवाळी रानफळांना बहर .. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळी रानफळांना बहर ..
हिवाळी रानफळांना बहर ..

हिवाळी रानफळांना बहर ..

अजित शेडगे, माणगाव
हिवाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते गुलाबी थंडीचे आणि या दिवसांत खायला मिळणाऱ्या विविध रानफळांचे. नुकतीच थंडीला सुरुवात झाली आहे. खास हिवाळ्यातील रानफळांचे आगमनही सुरू झाले आहे. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे रानावनात आंबे, जांभूळ, काजू, इत्यादी रानफळे खावयास मिळतात; तसेच खास हिवाळ्यातही विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे, चिंच इत्यादी फळांचा समावेश होतो. सध्या तालुक्यात याच रानफळांना बहर आला आहे.

चवीला गोड नसणारी आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग आहेत. पावसाळा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या थंडीच्या मोसमातील पौष्टिक व आरोग्यवर्धक फळे म्हणून ती प्रसिद्ध आहेत. आवळा, बोरे, चिंच ही आंबट चवीसाठी प्रसिद्ध असून खास हिवाळ्यात तयार होणारी बोंडे ही तुरट- राकट चवीसाठी प्रसिद्ध आहेत. या फळांप्रमाणेच रानावनात या दिवसात आमटीची फळे, काळेटीची फळे तयार झाली असून खास रानमेवा म्हणून ती प्रसिद्ध आहेत. जंगलातील वनवे आणि वृक्षतोडीमुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत असली, तरी या रानफळांचा गोडवा आणि चव खवय्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असतो. अशा या खास दिवाळी दिवसातील रानफळांची सध्या सर्वत्र चर्चा असून, त्यांना चांगली मागणी आहे. ही फळे खास क जीवनसत्व देणारी असून, थंडीच्या दिवसांत उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात.

रानबोरे
हिवाळ्यातील थंडीचे दिवस रान बोरांसाठी प्रसिद्ध आहेत. काटेरी अशा बोरीच्या झाडांवर आढळणारी बोरे पक्व होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात पाच ते दहा रुपयांना पुरचुंडीमध्ये ती विकली जात आहेत. कोकणातील रानावनात होणारी ही बोरे खास वाळवून मीठ लावून उन्हाळी दिवसांसाठी ठेवली जातात. यात बी मध्ये असणारे गरही खास खाण्यासाठी चविष्ट असतात. लहान मुले आवर्जून हे गर फोडून खातात. खाडीपट्ट्यातील टपोऱ्या बोरांचे खवय्यांना खास आकर्षण असते.
चिंचा
बोराप्रमाणेच या दिवसात आंबट-चिंबट अशा चिंचांचा मोसम सुरू झाला आहे. आकडेवाल्या, लांबसडक चिंचांनी झाडे लगडलेली दिसून येत आहेत. याच दिवसातील चिंचांचा स्वाद घेणे, मिठासोबत खाणे अनेक जण पसंत करतात. पूर्ण परिपक्व झालेल्या चिंचांचा मोसम सुरू होत असून, खवय्यांना त्याची भुरळ घालत आहेत. चिंचेचा कोळ तयार करणे, चिंचोके तयार करणे इत्यादी कामे या दिवसात घरोघरी केली जातात. या उद्योगातून अनेक कुटुंबांना अर्थाजनही प्राप्त होत असते.
आवळा
बोरी, चिंचाप्रमाणे बाजारात आवळा उपलब्ध झाले आहेत. भरपूर प्रमाणात जीवनसत्व देणारी आवळे शंभर रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत. आवळ्याचा पेठा, लोणचं, च्यवनप्राश इत्यादी बनवण्याकडे गृहिणींनी पसंत दिली आहे.
बोंडे
हिवाळी दिवसात रानात मिळणारे व सर्वांच्या पसंतीस उतरणारे फळ म्हणजे बोंडे होत. बोंडीच्या झाडावर हिवाळी दिवसात होणारे हे फळ खायला तुरट-राकट असते. मात्र, उन्हामध्ये पूर्ण वाळवल्यानंतर याच्यामध्ये येणारा गोडवा अवर्णनीय असतो. आदिवासी बांधवांना या फळांच्या मळा तयार करून चांगले अर्थाजनही मिळते.


हिवाळ्यातील रानफळे तयार झाली असून, खास रानमेवा म्हणून ती प्रसिद्ध आहेत. जंगलातील वनवे आणि वृक्षतोडीमुळे या रानमेवांच्या झाडांची संख्या कमी होत आहे. तरीदेखील या रानफळांचा गोडवा आणि चव खवय्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत आहे. खास आंबट चवीसाठी ही फळे प्रसिद्ध आहेत.
- संतोष पोटले, स्थानिक नागरिक.

बोरे, बोंडे, आवळा, चिंचा इत्यादी रानफळांना बाजारात विक्रीसाठी चांगली मागणी आहे. वाट्यावर, किलोप्रमाणे ही फळे विकली जातात. यातून अर्थार्जन होत असते.
- येनू जाधव, विक्रेता

टॅग्स :Raigad