
लोअर परळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील लोअर परळ येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणात ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांपैकी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला असून, उर्वरित चौघांनी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यापैकी दोघे १८, एक संशयित १९ वर्षांचा आहे. उर्वरित दोघे १६, तर एक जण १७ वर्षे ७ महिन्यांचा आहे. यातील अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पीडित मुलीचे १६ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. मित्राच्या वाढदिवसानिमित्त प्रियकर मुलाने पीडितेला पार्टीमध्यें सहभागी होण्यास सांगितले होते. दोघे दुसऱ्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोअर परळ येथे चाळीत गेले होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी अन्य पाच जणही तेथे उपस्थित होते. रात्री खोलीचा मालक मित्र व पीडित मुलीच्या प्रियकराने पोटमाळ्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या वेळी खोलीमध्ये त्याचे इतर चार मित्रही उपस्थित होते. त्यांनी दोघांना मदत केल्याचा आरोप आहे. नंतर चाळीतील रहिवाशांनी मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला पोलिस ठाण्यात आणले. तिच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.