राहुल गांधींना काय हवे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधींना काय हवे?
राहुल गांधींना काय हवे?

राहुल गांधींना काय हवे?

sakal_logo
By

राहुल गांधींना काय हवे?
- शेखर गुप्ता
------
राजकारण्यांना सत्ता हवी आहे, ज्याचे वर्णन राहुल यांनी विष असे केले आहे. जर राहुल यांना थेट सत्ता नको असेल तर त्यांनी तसे सांगितले पाहिजे. त्यांच्या पक्षातील साथीदार त्यांना एक प्रश्न विचारण्यासाठी फार आतूर आहेत, पण विचारायला घाबरतसुद्धा आहेत. आम्हाला सत्ता मिळवून देण्यासाठी जे करता येईल ते करण्यासाठी तुम्ही वचनबद्ध आहात का? जर नाही, तर हा नसता खटाटोप कशासाठी?
----------
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ १०७ व्या दिवशी राजधानी दिल्लीत प्रवेश करत आहे. ही यात्रा एक असफल राजकीय खेळी ठरली आहे, की ती त्यांच्या पक्षावर काही प्रभाव टाकण्यात यशस्वी झाली आहे? या लालसिंह चड्डा कॅम्पेनने राहुल यांची प्रतिमा एक जननेता म्हणून प्रस्थापित केली आहे, की त्यांचे विरोधक म्हणतात त्याप्रमाणे ते ‘पप्पू’ असल्याचेच सिद्ध झाले आहे? आणि जेव्हा ही यात्रा ४३ दिवसांनंतर श्रीनगरमध्ये संपेल तेव्हा राहुल आणि त्यांच्या पक्षाची स्थिती काय असेल? या उत्तरांसाठी आपण तीन प्रश्न पाहू या. एक म्हणजे काँग्रेस पक्ष प्रासंगिक आहे का? दुसरे काँग्रेस जनांना नेमके काय हवे आहे? आणि राहुल गांधींना काय हवे आहे? जर तुम्ही हे प्रश्न नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला विचारले, तर तुम्हाला उत्तर मिळेल. ते म्हणतील की अस्ताला चाललेल्या राजवंशाच्या मालकीचा पक्ष शेवटच्या घटका मोजत आहे, याने काही फरक पडत नाही. काँग्रेसमधील कुठल्याही हालचालीने, अगदी राहुल गांधींच्या सर्वसाधारण वक्तव्यानेही भाजप आणि त्यांच्या निवडणूक यंत्रणेला जेवढी उत्तेजना मिळते तेवढी कशानेही मिळत नाही. या यात्रेतील प्रत्येक भाषण, प्रत्येक घडामोडीची नोंद भाजपची समाजमाध्यम यंत्रणा घेत असते. भाजप हे कधीही कबूल करणार नाही; पण काँग्रेस हा आतापर्यंत त्यांचा सर्वांत मोठा विरोधक आहे, याची त्यांना कुणाहीपेक्षा अगदी यूपीएच्या घटक पक्षांपेक्षाही जास्त खात्री आहे.

भाजप काँग्रेसला २०२४ साठी आव्हान म्हणून बघत नाही; पण त्यांच्या यशाची गती खंडित करण्यास सक्षम असणारा हा एकमेव पक्ष आहे. कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणुका आता भाजपच्या अजेंड्यावर आहेत. येथे त्यांच्या रडारवरील एकमेव शत्रू काँग्रेस आहे. यात भर म्हणजे सध्या हा एकमेव पक्ष आहे, जो वैचारिक आधारावर कॅम्पेन उभे करत आहे. भारत जोडो विरुद्ध भारत तोडो. प्रेम विरुद्ध तिरस्कार. धर्मनिरपेक्ष विरुद्ध धर्मांध. आम आदमी विरुद्ध अदाणी/अंबानी. गांधी विरुद्ध सावरकर. तुम्ही या बाजूला असू शकता किंवा त्या बाजूला. तुम्ही असे म्हणू शकता की हे सर्व खोटे आणि दांभिक आहे; पण अशा प्रकारचे विभाजन करणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही भाजपचे समर्थक असाल, तर तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल. तुम्ही विचाराल की मोदी आणि शहांना राहुल आणि काँग्रेस का तापदायक वाटतील? पण त्यांना ते वाटतात. कारण ते निवडणुका जिंकणारे गंभीर राजकारणी आहेत. त्यामुळेच राहुल यांची पप्पू ही प्रतिमा कधीही बाजूला पडू नये, याची ते खबरदारी घेतात.

दुसरा प्रश्न आहे, काँग्रेस जनांना काय हवे आहे? याचे एका शब्दात उत्तर आहे- सत्ता. नाहीतर ते राजकारणात का राहतील? तिसरा प्रश्न असा आहे, की राहुल यांना काय हवे आहे? आणि इथेच आपण गोंधळात सापडतो. कारण आम्ही २००४ पासून हा प्रश्न विचारत आहोत आणि त्याचे उत्तर देण्यात अयशस्वी झालो आहोत. ही यात्रा काही नवीन सांगते का? त्यांना त्यांच्या पक्षाच्या साथीदारांप्रमाणे सत्ता हवी आहे का? याऐवजी त्यांना एक नवी नैतिक ताकद उभी करायची आहे का? निवडणूकविरहित, पण त्याचबरोबर अराजकीय नसेल अशी? राजा न होता एक तत्त्वज्ञानी? आणि असे असेल तर असा राजा कोण असेल, ज्याला तत्त्वज्ञानी राहुल सल्ला आणि शहाणीव देतील? राहुल यांनी जयपूरमध्ये ज्या दिवशी पक्षाचे उपाध्यक्षपद स्वीकारले त्या दिवशीच वादविवाद सुरू केला. सर्वांना हवीहवीशी असणारी सत्ता, हे विष आहे, असे ते म्हणाले. २६ एप्रिल २०१३ रोजी लिहिलेल्या ‘नॅशनल इंटरेस्ट’मध्ये मी याला दोषपूर्ण विधान म्हटले होते. लोकशाहीमध्ये सत्ता हे विष नसते, असा आमचा प्रतिवाद होता. मतदारांनी दिलेली ही एक सुंदर भेट, सन्मान आणि विशेषाधिकार आहे. चांगल्या नेत्याने याचा आनंद, नम्रता आणि कृतज्ञतेने स्वीकार केला पाहिजे. जर राहुलना खरेच सत्ता नको असेल, तर त्यांना काय हवे आहे? जर त्यांच्या थकलेल्या, हताश, पराजित झालेल्या पक्षाची पुनर्बांधणी हेच राहुल गांधींचे प्राथमिक उद्दिष्ट असेल, तर ते या यात्रेचा वापर आत्मविश्वास वाढवण्यासाठी, नवचैतन्य आणण्यासाठी, नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी, वैचारिक कायाकल्प घडवून आणण्यासाठी करू शकतात. दरम्यान, पक्षातील समित्यांमध्ये लोकशाही आणण्याची प्रक्रिया चालूच राहील. त्यांनी आपल्याला २००४ मध्येच सांगितले आहे की, पक्षात लोकशाही आणणे किंवा ज्याला आपण सरंजामशाहीमुक्त करणे म्हणतो ते करणे हा त्यांचा मुख्य कृतिकार्यक्रम आहे. यूपीए सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी न स्वीकारण्यामागे हेच कारण देण्यात आले होते. पक्षाने अखेर निवडणूक प्रक्रियेतून आपला अध्यक्ष निवडला. ही स्पर्धा कितपत निःपक्षपाती होती? शशी थरूर तसेही हरलेच असते; पण हा मुद्दा नाही. जर खरा, तात्त्विक आंतरिक बदल घडून आला असता, तर त्यांना सन्मान, आदर आणि कृतज्ञतेने वागवले गेले असते.

राहुल यांनी मोठ्या प्रमाणात एक गोष्ट साध्य केली आहे, ती म्हणजे त्यांच्या जवळजवळ मृतप्राय पक्षाचे मनोबल आणि उत्साह वाढवला आहे. त्यांच्याबरोबर चालणाऱ्या गर्दीत पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा आणि निष्ठावंत मतदारांचा समावेश आहे, हे त्यांच्या पक्षासाठी चांगले आहे. चांगले, पण पुरेसे नाही. अश्रुधूर किंवा लाठीकाठीची कोणतीही जोखीम नसणाऱ्या एका देशव्यापी राजकीय चळवळीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सिने अभिनेता, अर्थतज्ज्ञ, निवृत्त संपादक, लेखक, स्टँड अप कॉमेडियन हे राहुल यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवू शकतात. काहींसाठी तर ही गोष्ट इन्स्टाग्रामवर पुष्कळ प्रसिद्धी मिळवणारी ठरली. त्यांच्या पक्षाच्या व्यावसायिक राजकारण्यांना जे हवे आहे ते हे नाही. राजकारण्यांना सत्ता हवी आहे, ज्याचे वर्णन राहुल यांनी विष असे केले आहे. जर राहुल यांना थेट सत्ता नको असेल, तर त्यांनी तसे सांगितले पाहिजे. त्यांच्या पक्षातील साथीदार त्यांना एक प्रश्न विचारण्यासाठी फार आतूर आहेत, पण विचारायला घाबरतसुद्धा आहेत. आम्हाला सत्ता मिळवून देण्यासाठी जे करता येईल ते करण्यासाठी तुम्ही वचनबद्ध आहात का? जर नाही, तर हा नसता खटाटोप कशासाठी?
(अनुवाद ः कौस्तुभ पटाईत)