
दुप्पट रकमेच्या प्रलोभनाने १९ तरुणांची फसवणूक
अंधेरी, ता. २५ (बातमीदार) ः गुंतवणूक केलेली रक्कम ४५ दिवसांत दुप्पट करून देण्याचे प्रलोभन दाखवून १९ तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. या तरुणांकडून घेतलेल्या साडेदहा लाखांच्या अपहारप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मनीषकुमार जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो सध्या त्याच्या मित्रासोबत गोरेगाव परिसरात राहतो. गोरेगाव येथील हिरेन शॉपिंग सेंटरमध्ये तो मोबाईल रिपेअरिंगचे काम करतो. तिथे काम करताना त्याची काही कामगारांशी ओळख झाली होती. त्यातील एका मित्राने त्याला दुप्पट रकमेसंदर्भातील एक लिंक पाठवली होती. या ॲपविषयी चौकशी केल्यानंतर त्याने त्यात गुंतवणूक केल्यास ४५ दिवसांत रक्कम दुप्पट होते असे सांगिले. दुप्पट रकमेच्या प्रलोभनाला बळी पडून त्याने ते ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या नावाचे लॉगिन केले होते. गेल्या चौदा वर्षांपासून ते ॲप सुरू असून आतापर्यंत अनेकांना दुप्पट रक्कम मिळाली आहे असे त्याच्या मित्राने सांगितले होते. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या इतर १८ मित्रांनी १४ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत संबंधित ॲप डाऊनलोड करून त्यात सुमारे साडेदहा लाखांची गुंतवणूक केली होती; मात्र ४५ दिवसांत त्यांना दुप्पट रक्कम मिळाली नाही. चौकशीअंती त्याला ते ॲप फ्रॉड असून अनेकांनी ॲपद्वारे विविध प्रोडक्टवर खरेदी करून गुंतवणूक केली होती; मात्र कोणालाही त्यांचे पैसे दुप्पट करून मिळाले नव्हते. हा प्रकार उघडकीस येताच मनीषकुमारसह व इतर अठराजणांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारअर्जाची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेलला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत.