
कोरोना प्रतिबंधानंतर नाताळचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : दोन वर्षांच्या कोरोना साथीनंतर नाताळ सणाचा उत्साह, खरेदीची लगबग यंदा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबई शहर-उपनगर, ठाणेसह आसपासची शहरे विविधरंगी रोषणाईने उजळून गेली आहेत. ठिकठिकाणी मॉल्स, हॉटेल्स, बाजारपेठा सजल्या असून, नागरिकांचीही गर्दी उसळल्याने उत्साही वातावरण असल्याने व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च परिसरात नाताळनिमित्त नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा संपूर्ण परिसर नेत्रदीपक रोषणाईने उजळला आहे. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘विंटर लाईट फिएस्टा’ला कोरोनाने ब्रेक लागला होता; परंतु कोरोनाची लाट ओसरल्यानंतर यंदा तीन वर्षांनी हा फेस्ट साजरा करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. मुंबईतील प्रसिद्ध मॉल्समध्येही ख्रिसमसनिमित्त सजावट पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ग्राहकांना विविध खरेदीच्या ऑफर दिल्या जात आहेत. २४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत या ऑफर्स असल्याने येथेही ग्राहकांची गर्दी उसळत आहे. शाळांनाही सुट्टी लागल्याने मॉल्समध्ये भेटवस्तू दिल्या जात आहेत. ख्रिसमस काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेस्टो बार आणि पबमध्ये विविध ऑफर दिल्या जात आहेत.