
मार्गशीर्ष संपताच मांसाहार महागला
वाशी, ता.२५ (बातमीदार) ः ऑक्टोबर महिन्यापासून सुरु झालेल्या मार्गशीर्ष महिन्याची अखेर सांगता झाली आहे. या काळात उपवासामुळे अनेकांनी मासांहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता मार्गशीर्ष संपल्याने खव्वयांनी चिकन, मटण आणि मासळीकडे मोर्चा वळवल्याने बाजारात देखील भाव वाढले आहेत. त्यामुळे मासांहार करणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
मार्गशीर्ष महिन्यातील पाच गुरुवार महिलांचे उपवास असल्याने घरात मासांहार खाणे वर्ज्य केले जाते. हॉटेलमध्ये देखील ग्राहकांनी मासांहारी पदार्थांपेक्षा शाकाहारी खाण्यावर अधिक भर दिला होता. त्यामुळे एरवीही गर्दी असणाऱ्या दुकानांवरील गर्दी ओसरल्याचे चित्र होते. अशातच मार्गशीर्ष महिन्यात उपवासामुळे मागणी नसल्याने मासांहाराच्या दरात घट करून महिनाभर तोटा सहन करत व्यवसाय केला होता. मात्र आता
मार्गशीर्ष महिन्यातील उपवास संपले असल्याने चिकन, मटण व्यावसायिकांनंतर मासळी विक्रेत्यांनी देखील दर वाढवले आहेत.
----------------------------------
मासळीचे दरांत २५ टक्क्यांनी वाढ
महिनाभरापूर्वी ५०० रुपयाला असणारी सुरुमई १०० रुपयांनी वाढली आहे. पापलेट, मांदेली, बांगडा, रावस, कोळंबीचे दर देखील ५० ते १०० रुपयांनी वाढले आहेत. थर्टीफास्टच्या पूर्वी येणारा रविवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस मासांहारी खवय्यांना मिळणार आहेत. त्यामुळे या तीन दिवसाचा पुरेपुर आनंद घेण्यासोबत नववर्ष स्वागताचे बेतही आखले जात आहेत.
---------------------------------
आठवडाभर थर्टीफस्टचे बेत
२५ डिसेंबरपासून आठवडभरापासून थर्टीफस्टचे बेत खवय्यांनी आखले आहे. मात्र, मासांहारी पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांना यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. अनेक चिकन विक्रेत्यांनी यापूर्वी बॉलयर कोंबडीचे १७० ते १९० किलोचे दर वाढवत ते २४० रुपये केले आहेत. तर मटणाचे दर देखील ७०० रुपयांवरून ८०० रुपयांवर गेले आहेत.
--------------------------
सोशल मिडियावरून मार्केटिंग
चिकण, मटण व्यावसायिकांनी शहरात दुकाने थाटली आहे. तर परप्रांतीयांनी देखील मासेविक्री सुरु केली आहे. स्थानिक मासळी विक्रेत्यांना आजही मंडईत जाऊन व्यवसाय करावा लागतो. पारंपरिक पद्धतीने मासळी विक्री करणाऱ्या मच्छीमार व विक्रेत्यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर मासळीचे दरपत्रक पाठवून मार्केटिंग सुरु केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.