
युवा क्रिकेटपटूंना इरफान पठाणकडून धडे
नवीन पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम केंद्रासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट तज्ज्ञांनी केलेले डिझाईन, अव्वल रॅकिंग आणि प्रमाणित प्रशिक्षकांनी परिपूर्ण असलेली ‘क्रिकेट अॅकॅडमी ऑफ पठाण’ या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे माजी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी देशातील स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नियमित सराव, फिटनेस, समर्पण आणि कठोर परिश्रमावर भर देण्याचा सल्ला त्याने युवा खेळाडूंना दिला.
क्रिकेट अकादमी ऑफ पठाणची २०२४ पर्यंत देशभरात १०० हून अधिक केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गाझियाबाद, सिलिगुडी, कटक, भुवनेश्वर, पालघर, विशाखापट्टणम, जम्मू, कोलकता, नवी दिल्ली आणि कोईम्बतूर यांसारख्या शहरांमध्ये पुढील ३ महिन्यांत १० ते १२ क्रिकेट अकादमी लाँच करणार आहेत. याअंतर्गत पनवेलमधील कर्नाळा स्पोर्टस् ॲकॅडमीच्या प्रांगणात सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेली अकादमी सुरू करण्यात आली आहे. या ॲकॅडमीच्या माध्यमातून पनवेल विभागातील इच्छुक युवा क्रिकेटपटूंचे स्वप्न साकार होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अकादमीचे संस्थापक इरफान पठाण यांनी क्रिकेट खेळण्याचा त्यांचा अनुभव सांगितला; तर अकादमीच्या यशाबद्दल बोलताना व्यवस्थापकीय संचालक हरमित वासदेव यांनी देशाच्या प्रत्येक भागांतील तरुणांना या माध्यमातून संधी उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त केले.
-------------------------------
अकादमीची वैशिष्ट्ये ः
- या केंद्रांमध्ये २ मास्टरक्लास सत्रे होणार आहेत. एकूण १८० पेक्षा जास्त क्रिकेट पठाण अकादमीच्या विद्यार्थ्यांनी रणजी करंडक, सी. के. नायडू करंडक, कुचबिहार करंडक इत्यादींसह विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या राज्यांचे आणि जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व केले आहे.
- पिचव्हिजन, स्टॅन्स बीम आणि कॅप अॅप (मोबाईल अॅप्लिकेशन) सारख्या आधुनिक क्रिकेट तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पठाण केंद्राच्या क्रिकेट अकादमीने खेळ शिकण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मदत होणार आहे.