
खारघरच्या दारूमुक्तीसाठी निवडणूक घ्या
खारघर, ता. २४ (बातमीदार) : शहराच्या दारूमुक्तीसाठी रहिवाशांचा लढा सुरू आहे, पण प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दारूमुक्त खारघरसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्याची मागणी संघर्ष समितीने रायगड जिल्हा अधिकाऱ्यांना केली आहे.
खारघर शहर हे ‘नो लीकर झोन’ असावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला, युवक मंडळांचादेखील पाठिंबा मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे २००३ पासून खारघरच्या दारूमुक्तीसाठी रहिवाशांनी जनआंदोलनातून शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे, परंतु शासनाकडून न्याय मिळत नसल्याने अखेर संघर्ष समितीने रायगड जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून खारघर शहर दारूमुक्त करण्यासाठी भारतीय निवडणूक प्रक्रियेनुसार खारघर वसाहतीत निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे.
------------------------------
शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहरात जवळपास साठहून अधिक शाळा-महाविद्यालये आणि शैक्षणिक विद्यापीठे आहेत. तसेच या शहरात एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे हे शहर दारूमुक्त असावे, अशी खारघरवासीयांची मागणी आहे.
- विजय पाटील, सदस्य, संघर्ष समिती