
एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली
रोहा, ता. २५ (बातमीदार) ः धाटाव औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. एका कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरूनच ही वाहिनी फुटल्याने कंपनीतील वाहतुकीवरही परिणाम झाला. शिवाय लगतच्या गावांतही पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
धाटाव एमआयडीसीतील एक्सेल कंपनीसमोरच मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना २२ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. ही बाब कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने घटनेची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता वैभव पाटील यांना दिली. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे कंपनीतील वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी कंपनीचे उपाध्यक्ष संजय सपाटे तसेच वरिष्ठ व्यवस्थापक हाशिराम मंचेकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सकाळी ११ वाजता खोदकाम करत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. सध्या कंपनीच्या गेट नंबर दोनवरून वाहतूक सुरू केली आहे.
सुरुवातीला फुटलेली जलवाहिनी एक्सेल कंपनीची असल्याचा संशय होता. मात्र दुरुस्ती दरम्यान एमआयडीसीला पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तारांबळ उडाली. मुख्य जलवाहिनीतून धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने तसेच परिसरातील रोठ बुद्रुक, मळखंडवाडी, महादेववाडी, वाशी, तळाघर, बोरघर, लांढर आदी गावांना पुरवठा होतो. मात्र जलवाहिनी फुटल्याने गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
एमआयडीसीकडून कंपनीना पाणी काटकसरीने वापरण्याचा आवाहन करण्यात आले आहे. सध्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
एमआयडीसीतील मुख्य जलवाहिनीच्या कामाचे खोदकाम करायला साधारणतः चार-पाच तास लागले असून दुरुस्तीच्या कामासाठी आठ ते दहा तास अथवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. सध्या मुख्य जलवाहिनीचा पुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. त्यामुळे कंपन्या तसेच परिसरातील गावांत पाणीटंचाई निर्माण होईल. दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी स्थानिक नागरिक तसेच कंपन्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
- वैभव पाटील, उपअभियंता, एमआयडीसी धाटाव
रोहा : धाटाव एमआयडीसी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.