
कचरा प्रकल्पाचे विकेंद्रीकरण करा
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहरात कचरा प्रश्न बिकट झाल्याने शहराच्या कानाकोपऱ्यात आजही कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. यासाठी शहरातील एकाच ठिकाणी कचरा न टाकता कचरा प्रकल्पाचे विकेंद्रीकरण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कचरा समस्या बिकट झालेली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील लोकसंख्या जवळपास २० लाख झाली असून दिवसाला ६०० टन कचरा जमा होत आहे. तो एकाच ठिकाणी जमा न करता त्या त्या भागात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर वाढले; मात्र सुविधा कागदावर राहिल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. कचरा प्रश्न कधी संपणार असा सवाल नागरिक करू लागले आहेत. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद झाल्याचा गाजवाजा झाला; मात्र आजही तेथे कचरा टाकला जात असल्याने परिसरामधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कचरा प्रकल्पासाठी आरक्षित भूखंड
१) भाल उंबाली गाव (कल्याण ग्रामीण) मध्ये १०० हेक्टर जागा.
२) जुनी डोंबिवली गाव येथे ३.५ हेक्टर जागा.
३) मांडा-टिटवाळा येथे १० हेक्टर जागा.
या सर्व कचरा प्रकल्पांसाठी आरक्षित जागा लवकरात लवकर ताब्यात घेऊन वाडेभिंत बांधून संरक्षित करण्यात याव्यात. त्या ठिकाणी अत्याधुनिक कचरा प्रकल्प बनवण्यात यावा; अन्यथा या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होऊन मोकळी जागा शिल्लक राहणार नाही. यामुळे पालिकेने लवकर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
........................
कल्याण-डोंबिवली शहरातील कचरा एकाच ठिकाणी न टाकता शहरातील विविध ठिकाणी कचरा प्रकल्प जागेत टाकावा.
- सुधीर बासरे, माजी नगरसेवक
........................
कचरा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन गंभीर असून आरक्षित जागेवर टप्याटप्याने कचरा प्रकल्प राबवला जाईल.
- अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग, केडीएमसी
...................
जनतेवर फक्त कर लादले जातात; मात्र सुविधांची वानवा असून कचरा प्रश्न तर हास्यास्पद करून ठेवला आहे. प्रशासकीय राजवट असल्याने कुठलाही नगरसेवक असो वा राजकीय पक्ष बोलण्यास तयार नसल्याने कल्याण पूर्वमधील कचरा प्रश्न बिकट होत आहे.
- प्रथमेश सावंत, अध्यक्ष, सामाजिक संघटना.