पालिका अभियंतानंतर ठेकेदारावर संक्रांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका अभियंतानंतर ठेकेदारावर संक्रांत
पालिका अभियंतानंतर ठेकेदारावर संक्रांत

पालिका अभियंतानंतर ठेकेदारावर संक्रांत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : शहराचा कायापालट करताना कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, हे पालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा आपल्या धडक कारवाईने सिद्ध करून दाखवले आहे. कोपरी येथील सिद्धीविनायक चौकातील निकृष्ट कामासंदर्भात अभियंत्यावर कारवाई केल्यानंतर आता हे काम करणाऱ्या ठेकेदारालाही काळ्या यादीत टाकण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

ठाणे शहरातील रस्ते, विविध विकास कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पालिका आयुक्त अभिजित बांगर पाहणी करीत असून त्यांनी कोपरीतील अष्टविनायक चौक तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी, कळवा, साकेत परिसरात सुरू असलेल्या वाँटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामांचा आढावा घेतला. अष्टविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली होती. कार्यकारी अभियंत्यांनी खुलासा करताना सांगितले की, कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केले असून त्या कामाचे देयक अदा करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर पुन्हा आयुक्तांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात कामाचा दर्जा निकृष्ट करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे.

अभियंत्यांची कानउघाडणी
काम करणाऱ्या कंत्राटदाराचा समावेश काळ्या यादीत करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांना समज देण्यात आली. जरी कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केले तरी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते. त्यामुळे कंत्राटदाराने परस्पर काम केले हा अधिकाऱ्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले. याबाबत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकल्याचा कार्यकारी अभियंत्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबधितांचा खुलासा मागवून पुढील कार्यवाही करण्यात आली.

कळवा पुलावरील जाहिरातींची दखल
कळवा पुलाचे उद्‌घाटन झाले असले तरी काम सुरू असताना जे ब्लॉक लावण्यात आले होते ते अद्याप तसेच पडून असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली. पुलाच्या खांबांवर जाहिराती लावण्यात आल्याचेही दिसले. याची गंभीर दखल घेत तातडीने पुलाच्या खांबावर जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना दिले.