
ख्रिसमस निमित्त सामान्यांना आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : नाताळनिमित्ताने सर्व कोविड सुरक्षा नियमावलींचे पालन करत झायनोवा शाल्बी मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाच्या वतीने घाटकोपरच्या आर सिटी मॉल येथे मोफत तीन दिवसीय आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस हे शिबिर सर्वसामान्यांसाठी सुरू असणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून लोकांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्यापर्यंत त्यांचे प्राण कसे वाचवता येतील, यासाठी नेमके काय करावे, याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कुठेही, कधीही आणि कोणावरही येऊ शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जनरल फिजिशियन डॉ. ऊर्वी माहेश्वरी यांनी सांगितले, की हृदयविकाराचा झटका, बुडण्याच्या घटना, आग लागणे, आजारपण, जखमा आणि अपघात यांसारखी आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. त्यामुळे आपत्कालीन प्रशिक्षणाबाबत प्रत्येकाला माहिती असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. युनिट हेड रेनी वर्गीस म्हणाले, की रुग्णालयाच्या वतीने आम्ही समाजात जनजागृती मोहीम राबवत असतो. यंदाच्या वर्षी आपत्कालीन स्थितीत नेमके काय करणे आवश्यक आहे याची माहिती सर्वसामान्यांना असायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही लोकांना वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.