
हिरव्या मिरचीचा बाजारात ठसका
वाशी, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजार समिती हिरवी मिरचीच्या १५ हून अधिक गाड्या दाखल होत होत्या; मात्र आता फक्त १० ते ११ गाड्या आवक होत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने बाजारात हिरव्या मिरचीच्या दरांत ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात १६ ते २२ रुपये किलोला मिळणारी मिरची प्रतिकिलो २४ ते ४० रुपयांवर गेली आहे.
एपीएमसी बाजारात मार्चमध्ये हिरव्या मिरचीच्या दराने इतिहासात प्रथमच उच्चांक गाठला होता. मार्चमध्ये घाऊक बाजारात मिरचीला प्रति किलो १४० रुपये एवढा भाव मिळाला होता, परंतु, एप्रिल-ऑगस्टमध्ये सर्वच भाज्यांचे दर उतरल्याने हिरव्या मिरचीचे दरही आवाक्यात येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे हिरवी मिरची ही प्रतिकिलो १६ ते २३ रुपयांनी उपलब्ध होती, परंतु शनिवारी केवळ १० ते ११ गाड्या आवक झाली आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या मागणीतही वाढ झाल्याने दरात ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मत व्यापारी श्रीकांत मोहिते यांनी व्यक्त केले आहे.
--------------------------
किरकोळ बाजारावरही परिणाम
एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची दाखल होत असते. सध्या बाजारात २ हजारांहून अधिक क्विंटल मिरची दाखल होत आहे; मात्र मागणीनुसार पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वधारले असल्याने किरकोळ बाजारातदेखील दरवाढ झाली आहे. शनिवारी बाजारात फक्त २ हजार २४९ क्विंटल हिरवी मिरची दाखल झाली होती.