
घणसोलीत जीवाशी खेळ
घणसोली, ता.२५(बातमीदार)ः सेक्टर ५ येथील असलेल्या उपकेंद्राची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. अशातच या केंद्रात मद्यपींचा वावर असून सुरक्षेकडे देखील महावितरणचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
घणसोली सेक्टर ५ येथे महावितरणचे उप-विद्युत केंद्र आहे. काही महिन्यांपासून या स्टेशनची दयनीय अवस्था झाली असून दरवाजा तुटलेला असल्याने याठिकाणी मद्यपींचा वावर आहे. अनेकदा विद्युत घराच्या आतमध्ये असलेल्या मशिनवरच दारूच्या बाटल्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच हा परिसर दाट लोकवस्तीत असल्याने परिसरात खेळणाऱ्या मुलांच्या अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने या उप-केंद्राला बंदिस्त करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
-------------------------------------
घणसोली विभागातील सेक्टर ५ येथील विद्युत उपकेंद्राची दुरवस्था झाली आहे. येथे अनेक मद्यपी मद्यपानासाठी बसतात तसेच दरवाजा तुटलेला असल्याने एखाद्याचा जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.
-नितीन काटेकर, शाखा अध्यक्ष, घणसोली
---------------------
सेक्टर ५ येथील असलेल्या विद्युत उपकेंद्राच्या स्टेशनचा दरवाजा खराब असल्याने लहान मुले खेळताना चुकून आतमध्ये गेली तर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवण्याचीही चिंता वाटू लागली आहे.
-सानिका साटम, पालक