
जीर्ण इमारतीचा सज्जा कोसळला
नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : नालासोपारा येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी (ता. २५) दुपारी २ च्या सुमारास घडली. यात ३५ हून अधिक लोकांना चाळीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या घटनेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज विजय नगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूची साई निवास ही एकमजली चाळीची इमारत आहे. रविवारी २ च्या सुमारास बाल्कनीचा भाग अचानक कोसळून खाली आला. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २१ सदनिका; तर तळमजल्यावर १० सदनिका आहेत. रविवार असल्याने बहुतांश नागरिक घरात होते. अचानक दारासमोर स्लॅब कोसळल्याने इमारतीतील रहिवासी घरातच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही इमारत धोकादायक इमारत घोषित केलेली नव्हती. ही इमारत २५ वर्षे जुनी असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. त्यामुळे ही इमारत धोकादायक असतानाही पालिकेच्या यादीत याची कोणतीही नोंद नसल्याने शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे.