कॉटनग्रीन परिसरात ३६ लाखांचे एमडी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉटनग्रीन परिसरात ३६ लाखांचे एमडी जप्त
कॉटनग्रीन परिसरात ३६ लाखांचे एमडी जप्त

कॉटनग्रीन परिसरात ३६ लाखांचे एमडी जप्त

sakal_logo
By

अंधेरी, ता. २५ (बातमीदार) : कॉटन ग्रीन परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकलीस राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) काळाचौकी विभागातील अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून ३६ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून आरोपींमध्ये महिलेचा समावेश आहे. ती अमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले. शनिवारी (ता. २४) किल्ला न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात अमली पदार्थ खरेदी-विक्री होणार असल्याने एटीएसने मुंबई शहरातील तस्करांविरोधात विशेष मोहीम राबवली आहे. काळाचौकी पथकाचे अधिकारी परिसरात शुक्रवारी (ता. २३) गस्त घालत असताना कॉटन ग्रीन परिसरात काही जण अग्निशमन दलाच्या गल्लीत एमडी (मेफ्रेडॉन) विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. तिथे पाहणी केली असता अशोक बाबू गुरमिटकर हा संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे ६४ ग्रॅम वजनाचे एमडी सापडले. चौकशीत त्याने अक्का नावाच्या महिलेकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने लक्ष्मी सिद्ध जमादार ऊर्फ अक्का या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे पोलिसांना ७३ ग्रॅम वजनाचे एमडी सापडले. दोन्ही कारवाईत पोलिसांनी १३७ ग्रॅम वजनाच्या एमडी अमली पदार्थासह दोन मोबाईल, रोकड, सोन्याची अंगठी आणि पर्स आदी मुद्देमाल हस्तगत केला. या दोघांविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना पोलिसांनी अटक केली.