
एसी लोकलमध्ये फुकट्याचा सुळसुळाट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मागील अकरा महिन्यांत एसी लोकलमधून तब्बल २०,१०४ प्रवाशांनी विनातिकीट ‘गारेगार’ प्रवास केला. मध्य रेल्वेने त्यांच्यावर कारवाई करत ३८ लाख ७९ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
सध्या दिवसभरात मध्य रेल्वेवर ५६ एसी लोकल फेऱ्यांची संख्या आहे. या लोकलमधून दररोज सरासरी २,७०,७७८ प्रवासी प्रवास करतात. एसी लोकलच्या तिकीट भाड्यात ५० टक्के कपात केल्यानंतर एसी लोकलची प्रवासी संख्या वाढत जात आहे. याशिवाय गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवासीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.
एसी लोकल गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते; मात्र मोहिमेचा परिणाम दिसून येत नाही. दिवसेंदिवस मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्याचा त्रास अधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीस कमी असल्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे धावत्या एसी लोकलमध्ये तिकीट तपासनिसांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
दंडवसुलीमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने उपनगरीय लोकल गाड्या, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ३२.७७ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २१८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १२४.६९ कोटींची नोंद झाली होती. गेल्या वर्षापेक्षा यंदा ७४.८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एसी लोकलमधील कारवाई
महिना फुकटे प्रवासी
जानेवारी ९९५
जून २,८५८
सप्टेंबर ३,५७९
नोव्हेंबर १,७२०