
खचलेल्या चेंबरमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
धारावी, ता. २६ (बातमीदार) : शीव स्थानकाजवळील अवर लेडी ऑफ गुड चर्च व शाळेसमोरील पदपथावरील चेंबरवरील झाकण तुटलेल्या अवस्थेत असल्याने चेंबर कधीही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पदपथावरून सतत पादचाऱ्यांची वर्दळ असते. तसेच येथून शालेय विद्यार्थी व पालकांची रहदारी सुरू असते. या पदपथावरील चेंबरची अनेक झाकणे ही गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे येथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची वाट पालिका प्रशासन पाहत आहे का, असा सवाल पालक विचारत आहेत. या परिसरात शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई असताना एखाद्या विद्यार्थ्याचा चुकून जर पाय चेंबरमध्ये अडकल्यास एखादी दुर्घटना घडू शकते. तसेच येथील स्थानिक चर्चमध्ये येणारे भाविक तसेच जवळच असलेल्या आयुर्वेदिक रुग्णालयातील रुग्ण व शीव स्थानकात जाणारे प्रवासी इथूनच जातात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याअगोदर पालिका प्रशासनाने चेंबर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.