मोठागाव ते दुर्गाडी किल्ला अंतर होणार सहा मिनिटांचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठागाव ते दुर्गाडी किल्ला अंतर होणार सहा मिनिटांचे
मोठागाव ते दुर्गाडी किल्ला अंतर होणार सहा मिनिटांचे

मोठागाव ते दुर्गाडी किल्ला अंतर होणार सहा मिनिटांचे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : कल्याण रिंगरोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून यातील मोठागाव ते दुर्गाडी पूल या तिसऱ्या टप्प्यात ८७ टक्के भूसंपादन आत्तापर्यंत झालेले आहे. एमएमआरडीएने या टप्प्यातील उड्डाणपुलाच्या कामासाठी ५३१ कोटी ६८ लाखाची निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. मोठा गाव ते दुर्गाडी हा सुमारे १० किमीच्या प्रवासासाठी सध्या एक तासाचा कालावधी लागतो. रिंगरोड प्रकल्प झाल्यास हे अंतर अवघ्या सहा मिनिटांवर येणार आहे. रिंगरोड प्रकल्पामुळे डोंबिवली ते टिटवाळा हा कष्टदायक प्रवास अर्धा तासात नागरिकांना पूर्ण करता येईल, असे कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीमध्ये रविवारी विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ खासदार शिंदे व कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार शिंदे यांनी कल्याण रिंगरोड प्रकल्पाची माहिती दिली. कल्याण, डोंबिवली ते टिटवाळा या ३० किलोमीटर लांबीच्या रिंगरोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. ठराविक कालावधीत हा रोड पूर्ण होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे प्रयत्नशील आहेत. या कामानिमित्त नुकतीच खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास यांची भेट घेतली होती. या दरम्यान कल्याण रिंगरोड प्रकल्पातील मोठागाव ते दुर्गाडी किल्ला या तिसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ५३१ कोटी ६८ लाख रुपये अंदाजित खर्चातून हे काम केले जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीमुळे मोठागाव ते दुर्गाडी हे अंतर एका तासावरून थेट सहा मिनिटांवर येणार आहे.
---------------------------
कोट
सध्याच्या घडीला डोंबिवली मोठागाव या भागातून दुर्गाडी किल्‍ल्‍यापर्यंत जाण्यासाठी मोठा वळसा घेऊन जावे लागत आहे. शिळफाटा व ठाकुर्ली येथील कोंडींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागत आहे. हा प्रकल्प झाल्यास विनाअडथळा हे अंतर नागरिकांना कापता येईल.
-डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण