पनवेलवर पाणीटंचाईचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलवर पाणीटंचाईचे सावट
पनवेलवर पाणीटंचाईचे सावट

पनवेलवर पाणीटंचाईचे सावट

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता.२६ (वार्ताहर)ः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पनवेल शहरामध्ये दरवर्षी पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, म्हणून यंदा आठवड्यातील एक दिवस कपात करण्याचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतला आहे.
पनवेल शहराला ३२ एमएलडी एवढी पाण्याची प्रत्यक्षात मागणी आहे. अशातच माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने येथे साठवणुकीची क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे हे धरण लवकरच कोरडे होते. या जलाशयांमधून पनवेलला १३ ते १४ एमएलडी पाणी मिळते. परंतु, उन्हाळ्यात पाणी नसल्याने पनवेल शहरासाठी पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. पनवेल महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दररोज १५ ते १६ एमएलडी पाणी मिळते. एमआयडीसी पनवेल मनपाला चार एमएलडी पाणीपुरवठा करते. पण पाणीटंचाईच्या काळामध्ये देहरंग धरणाचे पाणी शहराला देता यावे म्हणून या जलाशयातून पाणी कपात करण्याच्या निर्णय पनवेल महापालिकेकडून घेण्यात आला आहे.
-----------------------------
पनवेल शहराला प्रत्यक्ष पाण्याची मागणी ः ३२ एमएलडी
देहरंग धरणातून दररोज होणारा पुरवठा ः १३ ते १४ एमएलडी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दररोज ः १५ ते १६ एमएलडी
एमआयडीसीकडून मनपाला पाणीपुरवठा ः ४ एमएलडी
----------------------------------------
जलकुंभनिहाय नियोजन
पनवेल शहरामध्ये सर्विस हौद, गंगाराम सिनेमागृह, मार्केट यार्ड, भाजी मार्केट, पटेल मोहल्ला, ठाणा नाका या जलकुंभ निहाय सोमवार ते शुक्रवार यादरम्यान अर्ध्या भागामध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शनिवार आणि रविवारी मात्र सर्व जलकुंभातून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
-------------------------------------
पाणी वितरणातील मुख्य त्रुटी ः
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाताळगंगा नदीतून पाणी उचलून भोकरपाडा येथे शुद्ध करते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे या कामाला विलंब झाला आहे.
- पनवेल महापालिकाच्या मालकीचे देहरंग धरण विस्तीर्ण आहे. मात्र, त्यात गाळ साचल्याने पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे. धरणातील गाळ काढण्याची चर्चा अनेक वर्षांपासून होत आहेत. दोनदा प्रयत्न सुद्धा झाले. परंतु, अपयश आल्याने उन्हाळ्यामध्ये टंचाई होते.
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीवर पनवेल शहराच्या पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. पनवेल महापालिका व राज्य सरकारने पर्यायांचा विचार केला नाही. जवळच असलेल्या मोर्बे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. हे पाणी शासकीय पातळीवर हालचाली केल्यानंतर पनवेल शहराला मिळू शकते.
--------------------------
पाताळगंगा नदीतून रविवारी व सोमवारी कमी पाणी मिळते. इतर काळात इलेक्ट्रिक शटडाऊन, ब्रेकडाऊनमुळे देहरंग धरणाचे जास्त पाणी घेऊन शहराची दररोजची गरज भागवण्यात येते. परंतु, त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.
-विलास चव्हाण, उप-अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पनवेल महापालिका