मानवतेच्या हितासाठी केले देहदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवतेच्या हितासाठी केले देहदान
मानवतेच्या हितासाठी केले देहदान

मानवतेच्या हितासाठी केले देहदान

sakal_logo
By

वसई, ता. २६ (बातमीदार) : समेळ पाडा येथील ज्येष्ठ समाजसेवक व देहदान, अवयवदान चळवळीत सातत्याने सहभाग घेणारे जयवंत वाळिंजकर यांनी मृत्यूनंतर देहदान केले आहे. त्यांचा मृत्यू शनिवारी (ता. २४) अल्पशा आजराने झाला. त्यानंतर त्वरित देहदानाची प्रक्रिया करण्यात आली. मानवतेच्या हितासाठी देहदानाचा निर्णय घेत त्यांनी समाजासमोर मृत्यूनंतरही आदर्श निर्माण केला आहे.
नालासोपारा पश्चिम येथे राहणारे जयवंत धर्माजी वाळिंजकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १० वर्षांपूर्वी देहदानाचा निर्णय घेत सर्व सोपस्कार पार पाडले होते. एकीकडे देहदान, अवयवदान करताना निर्माण होणारे गैरसमज पाहता दान करणारे कमी लोक पुढे येतात. त्यातच वाळिंजकर यांनी समाजासमोर आदर्श निर्माण करीत देहदान चळवळीचे महत्त्व मृत्यूनंतरही समाजासमोर मांडले आहे. मृत्यूनंतर देहाची राख करण्याऐवजी वैद्यकीय शास्त्रासाठी देहाचा उपयोग होईल हा विचार त्यांच्या मनात दहा वर्षांपूर्वी आला आणि त्यांच्या कुटुंबियांनी मृत्यूनंतर नायर रुग्णालयात जाऊन पूर्ण प्रक्रिया पार पाडली. यात ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन बॉडी डोनेशन’चे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील पवार, नायर रुग्णालयाचे लक्ष्मण धुरी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले डॉ. नितीन वाळिंजकर, रणधीर वाळिंजकर, डॉ. सुचिता वाळिंजकर (कोरिया) व पंकज वाळिंजकर व तीन भाऊ असा परिवार आहे. वाळिंजकर एसटी महामंडळातून निवृत्त झाले होते. समाजसेवेची त्यांना आवड होती. त्यामुळे समाजोन्नती मंडळाच्या रोहिदास ज्ञाती पंचायतीचे समेळपाडा अध्यक्ष, नालासोपारा ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष होते. तसेच वसई सहकार पतपेढी संस्थेवर संचालक म्हणूनदेखील काम केले होते.
------------
पत्नीचादेखील देहदानाचा निर्णय
जयवंत वाळिंजकर यांच्या पत्नी उषा वाळिंजकर ७४ वर्षांच्या आहेत. त्यांनीदेखील देहदानाचा निर्णय घेतला आहे. मृत्यूनंतर आपला देह इतरांच्या कामाला येईल असा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे पतीने घेतलेला देहदानाचा निर्णय त्यांना अभिमानस्पद वाटत आहे.
------------
रुढी-परंपरांच्या जोखडातून बाहेर निघत सकारात्मक आणि धाडसी कृती भावाने केली, हे अभिमानास्पद व समाजाला प्रेरणा देणारे आहे. अवयव आणि देहदान चळवळ त्यांनी सातत्याने राबवली. मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले आहे.
- शांताराम वाळिंजकर, भाऊ
-------------
बाबांचा देह हा वैद्यकीय अभ्यासासाठी उपयोगी असणार आहे. समाजात देह, अवयवदान महत्त्वाचे आहे. मृत्यूनंतर अनेकांना याचा फायदा होतो, नवसंजीवनी मिळते. बाबांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
डॉ. नितीन वाळिंजकर, मुलगा
----------------
फोटो - जयवंत वाळिंजकर