
थंडीपासून बचावासाठी ड्रायफ्रुटसचा आधार
वाशी, ता.२६ (बातमीदार)ः गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे वाढणाऱ्या थंडीत आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेथी लाडूसह सुकामेवा अर्थात ड्रायफ्रुट्ला मागणी वाढली आहे. अशातच गेल्या वर्षीच्या तुलनेत अंजीर, गोडंबी, काजूचे भाव बऱ्यापैकी स्थिर आहेत. मात्र, हिरवा पिस्ता, बदाम आणि जर्दाळूच्या दरात मात्र ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पावसाळा लांबल्याने यंदा थंडी सुरू होण्यास विलंब झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करताना शरीरातील उष्मा कायम ठेवण्यासाठी परिणामकारक असलेल्या ड्रायफ्रुट्सला मागणी वाढली आहे. सध्या एपीएमसीमध्ये ड्रायफ्रुट्स खेरदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. शिवाय शरिरात ऊर्जा निर्माण करणारे मेथीचे, सुकामेव्याचे लाडू, बदाम, काजू, अक्रोड, जर्दाळू, खोबरे, खारीक, डिंक, गोडंबी, पिस्ता, अंजीर, मेथी दाणा यांना देखील मागणी असल्याचे व्यापारी सुरेंद्र पटेल यांनी सांगितले.
-----------------------------
मेथी तसेच डिंकाच्या लाडूचे भाव स्थिर असून ५६० रुपये किलोने विक्री होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हिरवा पिस्ता, बदाम, जर्दाळूसह अन्य काही मालाचे भाव काहीसे वधारले आहे. यासह मेथी दाणा १२० रुपये किलो, खसखस २४०० रुपये किलो, काळे मनुके ६०० ते ७०० रुपये, लाल मनुके ९०० ते १००० रुपये, चिल्ला गोझा ४,४०० रुपये प्रती किलो असे दर असल्याचे सांगितले. थंडीची चाहूल लागल्यापासून पौष्टिक लाडूसह अन्य सुका मेव्याची मागणी वाढली आहे.
---------------------------
ड्रायफ्रुट्सचे भाव (किलोप्रमाणे)
प्रकार - सध्याचे दर
बदाम - ७२० ते ११००
बदाम मामरा - २४०० ते २६००
काजू - ९०० ते १२००
मनुके - ४०० ते ४४०
हिरवा पिस्ता - १८०० ते २०००
अक्रोड मगज - १५००
अंजीर - १००० ते १६००
जर्दाळू - ७०० ते १०००
खोबरे - २२०- २३०
खारीक - ३०० ते ५५०
डिंक - ४०० ते ५००
डिंक लाडू - ५६०- ५६०
मेथी लाडू - ५६०-५६०